मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन
बेळगाव : गेल्या सात वर्षांत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा कायापालट करून नवा इतिहास घडविला आहे. शेकडो शाळा, अंगणवाडी खोल्यांची निर्मिती, मंदिरांचा जीर्णोद्धार, रस्त्यांचा विकास, समुदाय भवन उभारणी व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन याआधी कधी झाली नाहीत इतकी कामे झाली आहेत, याचे आपल्याला समाधान आहे, असे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. धामणे एस. येथे सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या सोमवारी दोन अतिरिक्त खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करून त्या बोलत होत्या. 44.83 लाख रुपये खर्चातून शाळाखोल्या उभारण्याच्या कामाला चालना देण्यात आली.
बांधकामाची गुणवत्ता राखण्याची सूचना कंत्राटदारांना देण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांची कामे केली जात आहेत. तुमचे सहकार्य असेच मिळू दे, अशी विनंतीही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. यावेळी युवराज कदम, धाकलू पाटील, मारुती चोकुलकर, प्रकाश हाजगोळकर, गावडू बेक्केहाळकर, सोमाण्णा पाटील, आप्पाजी पाटील, अभियंते केदार, पत्तार, शेगुणशी, मुनव्वर बेळगावकर व कंत्राटदार जोगी उपस्थित होते. दरम्यान, हाजगोळी मुख्य रस्त्यापासून धनगरवाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचाही शुभारंभ करण्यात आला. 8 कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. पूजन करून कामाला चालना देण्यात आली.









