क्युआर कोड स्कॅन करून अनुभव नोंद करता येणार
बेळगाव : वेगवेगळ्या तक्रारी घेऊन पोलीस स्थानकात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांशी अनेकवेळा पोलीस व अधिकारी व्यवस्थितपणे वागत नाहीत. त्यामुळे नेहमी लोक पोलीस दलाच्या नावाने शिमगा करतात. आता या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी बेळगाव पोलीस दलात ‘लोकस्पंदन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयुक्त सिद्धरामप्पा, उपायुक्त शेखर एच. टी., पी. व्ही. स्नेहा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला चालना देण्यात आली. यापूर्वी जनस्नेही पोलीस व्यवस्थेसाठी व्हिजिटर रजिस्टरची व्यवस्था होती. आपली कामे घेऊन पोलीस स्थानकात येणाऱ्या नागरिकांनी आपल्याला कशी वागणूक मिळाली? याविषयी या रजिस्टरमध्ये तंत्रज्ञानाद्वारे नोंद करण्याची पद्धत रुढ होती.
आता प्रत्येक पोलीस स्थानकात ‘लोकस्पंदन’ उपक्रमांतर्गत क्युआर कोडची व्यवस्था असणार आहे. नागरिकांना सहजपणे क्युआर कोड स्कॅन करून पोलीस स्थानकात आपल्याला काय अनुभव आला? पोलीस स्थानकात उत्तम सेवा मिळाली काय? याविषयी आपली प्रतिक्रिया नोंदविता येणार आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर असणार आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून दाखल होणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन पोलीस दलातील सेवा अधिकाधिक लोकाभिमुख बनवता येणार आहे. त्यामुळेच ‘लोकस्पंदन’ उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी क्युआर कोड स्कॅन करून आपली प्रतिक्रिया नोंदवावी. पोलीस स्थानकात कसा अनुभव आला, हे स्पष्टपणे कळवावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.









