कोल्हापूर प्रतिनिधी
पोलीस ठाण्यामध्ये 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यकाल बजाविलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस सुरुवात झाली. जिह्यातील 650 कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय बदलीसाठी अर्ज केले आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बदल्यांची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, कोरोनामुळे जिह्यातील पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. मात्र नोव्हेंबर 2022 मध्ये गृहखात्याने प्रशासकीय बदल्या करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळा आणि कॉलेजची अडचण लक्षात घेऊन बदली प्रक्रिया राबविली नाही. यामुळे आता या बदल्या मे महिन्यापूर्वी करण्यात येणार आहे. एकाच पोलीस ठाण्यात 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलिसांच्या आता बदल्या केल्या जाणार आहेत. बदलीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीक्रमानुसार तीन पर्याय मागविण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सोयीनेच बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.