नवे डीसीपी शेखर टेक्कण्णावर
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोमवारी बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला असून बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांची बेंगळूर येथील पोलीस कमांड सेंटरला बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर शेखर एच. टेक्कण्णावर यांची नियुक्ती करण्यात आली. 13 आयपीएस अधिकाऱ्यांसह 70 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांची बढतीवर बदली झाली असून रिक्त झालेल्या पदावर अरुणकुमार कोळूर हे रुजू झाले आहेत. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांची हुनगुंदला बदली झाली असून त्यांच्या जागेवर गुप्तचर विभागाचे प्रशांत सिद्धनगौडर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांची हुबळी-धारवाड येथील सीसीबीच्या एसीपीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर बेंगळूर पश्चिम विभाग वाहतूक विभागाचे एसीपी गोपालकृष्ण गौडर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर एम. वेणुगोपाल यांची नियुक्ती झाली असून डीसीआरबीचे पोलीस निरीक्षक वीरेश दोडमनी यांची बळ्ळारी आयजीपी कार्यालयात नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागेवर जेम्स लाय झेवियर मेनेजस यांची वर्णी लागली आहे. वाहतूक विभागाचे एसीपी शरण्णाप्पा यांची टीटीआय बेंगळूरला बदली झाली आहे.









