बेळगाव : शहर हेस्कॉम विभागात मागील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या जागांवर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केपीटीसीएलमधील अधिकारी हेस्कॉममध्ये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे हेस्कॉमच्या रखडलेल्या कामकाजाला आता पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. हेस्कॉमचे शहर विभागाचे कार्यकारी अभियंते एम. टी. अप्पण्णवर यांची शिर्शी येथे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अद्याप इतर अधिकाऱ्यांची नेमणूक झाली नसल्याने शहर उपविभाग-2 चे साहाय्यक कार्यकारी अभियंते यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शहर उपविभाग-3 (उत्तर) विभागात काम करणारे साहाय्यक कार्यकारी अभियंते संजीव हम्मण्णवर यांची शहर उपविभाग-1 मध्ये साहाय्यक कार्यकारी अभियंते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मागील 2 ते 3 वषर्पांसून केपीटीसीएलमध्ये कार्यरत असणारे ए. एम. शिंदे यांची शहर उपविभाग-3 मध्ये पुन्हा बदली झाली आहे. शहर विभागामध्ये बदली करून घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले होते. परंतु, संजीव हम्मण्णवर व ए. एम. शिंदे यांनी यामध्ये बाजी मारली. या दोघांनीही शहर विभागात यापूर्वी काम केले असल्याने हेस्कॉमच्या रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
सक्षम कार्यकारी अभियंत्यांची गरज
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून विद्युत ग्राहकांची संख्याही त्यापटीने वाढत आहे. ग्राहकांची संख्या वाढली असली तरी कर्मचाऱ्यांची संख्या तितकीच आहे. यामुळे घरगुती ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहर कार्यकारी अभियंत्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आपला वचक ठेवणे गरजेचे आहे. मागील काहीवर्षांत अधिकारीवर्गाचा वचक नसल्याने कारभार ढिसाळ बनला आहे.









