कोल्हापूर :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (केडीसीसी) तब्बल 630 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. तीनपेक्षा अधिक वर्षे एकाच शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर नाबार्डने हरकत घेतल्याने ही कारवाई होत आहे.
या बदल्यांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना 19 जुलै (शनिवार) पर्यंत तीन शाखांचे पर्याय तालुक्यातील दोन व शेजारील तालुक्यातील एक सुचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, सुचवलेल्याच शाखांमध्ये जागा उपलब्ध असली पाहिजे, अन्यथा बँकेने ठरवलेल्या शाखेत बदली केली जाणार आहे.
सरकारी नियमांप्रमाणे, कर्मचाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी व्हाव्यात, असा संकेत आहे. कारण, एखाद्या शाखेत दीर्घकाळ कार्यरत राहिल्यास कर्मचाऱ्याचे स्थानिक हितसंबंध निर्माण होण्याचा धोका असतो. यामुळे कामकाजावर परिणाम होतो, अपहारास खतपाणी मिळते आणि पारदर्शकता कमी होते.
- अपहाराच्या घटनांत समान सूत्र
बँकेत याआधी घडलेल्या अपहारांच्या घटनांचा आढावा घेतला असता, संबंधित कर्मचारी त्या शाखेत अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, नियमित बदल्यांमुळे अशा घटनांना आळा बसेल, अशी बँकेची भूमिका आहे.
- राजकीय हस्तक्षेपामुळे विषय वारंवार लांबणीवर
गेल्या वर्षीही बदल्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो बाजूला ठेवण्यात आला. यंदाच्या नाबार्ड तपासणीत पुन्हा यावर ठोस मुद्दे मांडले गेले. त्यामुळे बँक प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला.
- शाखांमध्ये नवचैतन्याची अपेक्षा
या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांना विविध विभागांत कामाचा अनुभव मिळेल, शाखांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, तसेच प्रशासनातील पारदर्शकतेस चालना मिळेल, अशी अपेक्षा बँकेकडून व्यक्त होत आहे.








