रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शुक्रवारी पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न मार्गी लावला. जिल्ह्यातील एकूण २५८ पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय २१९, चालक संवर्गातील २७ तर आंतरजिल्हा १२ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये ३० सहाय्यक पोलीस फौजदार, ७२ पोलीस हवालदार, ४ पोलीस नाईक, ११३ पोलीस कॉन्स्टेबल तर चालक संवर्गातील १५ हवालदार, १ पोलीस नाईक, ११ पोलीस शिपाई तसेच आंतरजिल्हा बदल्यांमध्ये १ हवालदार, २ पोलीस नाईक ९ पोलीस शिपाई पदांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर अस्थापन मंडळ गठीत करण्यात आले होते. सदस्य म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रभारी उपअधीक्षक राधिका फडके, सचिव म्हणून प्रभारी कार्यालय अधीक्षक श्रद्धा तळेकर यांचा समावेश होता. पोलीस अधिकारी व अंमलदारांचे समूपदेशन करुन त्यांच्या पसंती क्रमाचा प्रशासकीय दृष्ट्या विचार करुन बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.








