निवडणूक काळादरम्यान निष्काळजीपणाचा ठपका : मुख्य कर्तव्यापासून ठेवणार दूर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अनेक उच्च पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले असून त्यात 25 पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक, नऊ जिल्हा दंडाधिकारी, चार सचिव आणि पाच विशेष सचिव यांचा समावेश आहे. आढावा बैठकीत निवडणूक आयोगाला काही अधिकाऱ्यांचे कामात निष्काळजीपणा आणि निवडणुकीचे प्रलोभन म्हणून बेकायदेशीर मद्य पुरवठा यासह अनेक प्रकरणांमध्ये मिलीभगत आढळून आल्याने संबंधितांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या कनिष्ठांकडे पदभार सोपवण्यास सांगितले. याबाबत संबंधित राज्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये 7 ते 30 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पाच राज्यांतील आढावा बैठकीदरम्यान निवडणूक आयोगाने ईडी आणि जिल्हा प्रशासनाला निवडणूक प्रक्रियेदरम्यान लाचखोरीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने राज्यांमध्ये दारू आणि रोख वितरणाबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या निर्देशानुसार, हरियाणा आणि पंजाबमधील अवैध दारू हनुमानगड, चुरू, झुंझुनू आणि अलवर जिह्यांमधून राजस्थानमध्ये प्रवेश करते. आयोगाने हनुमानगड, चुरू आणि भिवडी येथील पोलीस अधीक्षक (एसपी) आणि अलवर जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ) यांच्या बदलीचे आदेश दिले. तसेच तेलंगणामध्ये काही बिगर-संवर्ग अधिकारी जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्त केले असून प्रशासकीय आणि पोलीस सेवांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या नसलेल्या पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. तेलंगणागत 13 एसपी आणि पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. बदली झालेल्या 13 पोलिस अधिकाऱ्यांपैकी 9 नॉन-केडर पोलीस अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाने तेलंगणा सरकारला निवडणुकीदरम्यान उत्पादन शुल्क आणि व्यावसायिक कर विभागासाठी स्वतंत्र प्रधान सचिव नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. बीएसएफ आणि आसाम रायफल्ससह अनेक सुरक्षा यंत्रणांना मिझोराम आणि राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.









