महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी मांडल्या व्यथा
बेळगाव : बेळगाव जिल्हा म्हणजे चरण्याचे कुरण बनले आहे. याठिकाणी एखादा अधिकारी रुजू झाला तर तो एकाच ठिकाणी 20 ते 25 वर्षे सेवा बजावत आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय? असे म्हणत अक्षरश: अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणण्याचे थेट धाडस बेळगावच्या जनतेने महापालिकेच्या आढावा बैठकीत दाखविले. या सर्व ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा, असा जोरदार हल्लाबोलच बेळगावकरांनी केला. यामुळे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे काम कशा प्रकारे चालते, हे नूतन मंत्र्यांसमोर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दाखवून दिले. भ्रष्टाचाराच्या विळख्यामुळे महापालिकेमधील कोणतीही कामे तातडीने होत नाहीत. काहीतरी कारण सांगायचे आणि काम करणे टाळायचे, असा नियमित कार्यक्रम हे अधिकारी राबवत आहेत, असा आरोप नगरसेवकांबरोबरच जनतेने केला. घर बांधण्यासाठी परवानगी, पीआयडी क्रमांक देण्यासाठी, जन्म दाखला, मृत्यू दाखला, वारसा करणे, खरेदी-विक्री केल्यानंतर नाव दाखल करणे यासाठी या ठिकाणी एजंटराज सुरू आहे. अक्षरश: मोठी कीड महापालिकेला लागली असून प्रथम या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करा, अशी जोरदार मागणी जनतेने केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह इतर आमदारांनी महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली. त्यामध्ये जनतेने आपल्याला होत असलेला त्रास याठिकाणी पोटतिडकीने मांडला. नगरसेवकांनी तर अक्षरश: हतबल होऊन आपली भूमिका मांडली. यामुळे महापालिकेतील ठाण मांडून राहिलेले अधिकारी किती गडगंज झाले असतील, अशी चर्चाही रंगली होती. महसूल विभागाने अक्षरश: मेनू कार्डच छापल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. माहिती अधिकार हक्काखाली कोणतीही माहिती मागितल्यानंतर ती वेळेत दिली जात नाही. काहीतरी सांगून टाळाटाळ केली जाते. याबाबत अनेकांनी आरोप केले. भ्रष्टाचार बाहेर पडू नये यासाठी हे अधिकारी माहिती अधिकार हक्काखाली कोणतीच माहिती देत नसल्याचा आरोपदेखील आरटीआय कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेने केला आहे. बेळगाव जिल्हा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका भ्रष्टाचारमुक्त करायच्या असतील तर सर्जिकल स्ट्राईक करूनच या अधिकाऱ्यांची बदली करा, अशी जोरदार मागणीही करण्यात आली आहे.
प्रभाग कमिटी नेमण्याची मागणी
बरीच वर्षे उलटूनदेखील प्रभाग कमिटी नेमण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. यावर महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी अजून स्टँडिंग कमिटी नेमल्या नाहीत. त्यामुळे प्रभाग कमिटी नेमली नसल्याचे उत्तर दिले. मात्र अनेकांनी यावेळी त्यांच्यावर कडाडून टीका केली.
मराठीतून कागदपत्रे देणार
मनपामध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीची कागदपत्रे कन्नडमध्ये देण्यात आली. त्यामुळे मराठी भाषिक असलेल्या नगरसेवकांनी मराठीतून बैठकीच्या नोटिसा तसेच कागदपत्रे द्यावीत, अशी मागणी केली. बैठकीच्या सुरुवातीला नगरसेवक रवी साळुंके यांनी ही मागणी केल्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढील बैठकीत मराठीतून कागदपत्रे दिली जातील, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर महापालिका अधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आली आहे.









