मण्णीकेरी ग्रामस्थांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मण्णीकेरी येथे जुने ब्रह्मलिंग मंदिर आहे. या मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने ब्रह्मदेव ट्रस्ट कमिटीच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र तेथील पुजारी जीर्णोद्धारासाठी आडकाठी आणत आहेत. यामुळे मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पुजाऱ्यांकडे असणारी देवस्थानची जमीन मंदिराच्या नावे करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मंदिराची पूजा-अर्चा करणाऱ्यांच्या ताब्यात जवळपास 25 एकर शेती आहे. सदर शेती देवस्थानची असली तरी पुजाऱ्यांकडून शेतीवर आपला हक्क सांगण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी मंदिर जीर्णोद्धारासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. यासाठी जागेची आवश्यकता आहे. याबाबत पुजाऱ्यांकडे बोलले असता, ते जमीन देण्यास नकार देत आहेत. ग्रामस्थांकडून पुजाऱ्यांना पर्यायी जागेचा पर्याय देण्यात आला होता. यालाही त्यांनी नकार दिला आहे.
पुजाऱ्यांकडून मंदिर जीर्णोद्धारासाठी आडकाठी
सर्व्हे क्रमांक 63/1/2 व 71/25/9 सर्व्हे क्रमांकाची देवस्थानची जमीन आहे. ही जमीन पुजाऱ्यांच्या उपजीविकेसाठी देण्यात आली आहे. एवढी जमीन असूनही एक नवा पैसादेखील ते मंदिरासाठी खर्च करत नाहीत. उलट कमिटीकडून वर्षाला 20 हजार रुपये पूजा-अर्चासाठी देण्यात येतात. महाप्रसाद असो वा यात्रा याचा खर्चही कमिटीकडून उचलण्यात येतो. तरीदेखील पुजाऱ्यांकडून मंदिर जीर्णोद्धारासाठी आडकाठी आणण्यात येत आहे. यासाठी पुजाऱ्यांच्या ताब्यात असणारी जमीन परत मंदिराच्या नावे करून मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शरणय्या स्वामीजी, सुरेश सनदी, यल्लाप्पा तेरगी, यल्लाप्पा दड्डीकर, आजप्पा आजाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









