खासदारांची जिल्हा प्रशासनाला सूचना : विकासकामांचा घेतला आढावा
बेळगाव : बेळगाव शहराभोवताली रिंगरोड निर्माण करण्यात येणार आहे. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात आले असले तरी नावगे, बेळगुंदी भागातील शेतकरी तसेच नागरिकांना जमिनीच्या भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हा प्रशासनाला केली. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. पाऊस कमी होताच बायपासच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्याची सूचना खासदारांनी केली.
बेळगावच्या शगमहट्टी-हुंदगुंद-रायचूर या नवीन महामार्गाच्या कामासाठी 80 टक्के भू संपादन पूर्ण झाले असून उर्वरित भू संपादन लवकरच केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी हवाई दलाकडून देण्यात येणाऱ्या जमिनीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या संदर्भात योग्य तो तोडगा निघेल, असे सांगण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, भू संपादन अधिकारी राजश्री जैनापुरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बलराम चव्हाण यांच्यासह भुवनेशकुमार व विमानतळ प्राधिकरण, केआयएडीबीचे अधिकारी उपस्थित होते.









