सत्ताधारी गटातर्फे मनपा आयुक्तांना पत्र
बेळगाव : मनपाच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्याशी संबंधित गैरकारभाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची अन्यत्र बदली करावी, असा ठराव 26 सप्टेंबरच्या सर्वसाधारण बैठकीत केला होता. तरीदेखील तालिकोटी सोमवारपासून पुन्हा आपल्या मूळपदावर रूजू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची बुधवारपर्यंत अन्यत्र नियुक्ती न झाल्यास महापालिकेसमोर धरणे धरण्यात येईल, अशा इशाराचे पत्र सत्ताधारी गटातर्फे मंगळवारी मनपा आयुक्त शुभा बी. यांना देण्यात आले.
महानगरपालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. ई-आस्थी, पीआयडी, त्याचबरोबर करार संपून देखील महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे भूभाडे वसूल न करणे, इतकेच नव्हेतर त्या मिळकती ताब्यात न घेणे, न्यायालयीन प्रकरणांमध्ये योग्य कारवाई न करणे, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत योग्य माहिती न देणे, आपल्या खालील अधिकाऱ्यांना व्यवस्थितरित्या माहिती न देणे यासारख्या तक्रारी त्यांच्यावर आहेत.
अधिकाराचा दुरुपयोग आणि वेगा हेल्मेट प्रकरणात पाच जणांचा सहभाग आहे. सदर प्रकरण लोकायुक्तांकडे चौकशीसाठी सोपविण्यात आले आहे. याबाबत सर्वसाधारण सभेतही ठराव करण्यात आला होता. वरील सर्व बाबी लक्षात घेता जनतेच्या हितासाठी आणि महानगरपालिकेच्या कारभारात सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्यांची इतरत्र नियुक्ती करावी. बुधवारपर्यंत त्यांची अन्यत्र बदली न केल्यास महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
रेश्मा तालिकोटी यांची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात यावी. यासाठी चौकशी समितीची स्थापना करावी. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तालिकोटी यांची इतरत्र बदली करावी. चौकशीत त्या दोषी आढळल्यास सदर अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात यावा, असा ठराव 26 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत केला होता. ठराव पारित करण्यासाठी मतदानही घेण्यात आले. यानंतर आयुक्त शुभा बी. यांनी प्रभारी महसूल उपायुक्त म्हणून कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांची नियुक्ती केल्याचा आदेश जारी केला होता. तरीदेखील तालिकोटी या सोमवारी महापालिकेत पुन्हा आपल्या जागी रूजू झाल्या. त्यामुळे तातडीने त्यांची अन्यत्र बदली करण्यात यावी, अन्यथा महापालिकेसमोर धरणे धरण्यात येईल, असा इशारा सत्ताधारी गटातर्फे देण्यात आला. यावेळी उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.









