सातारा :
जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली बदली ही चांगल्या आणि सोयीच्या ठिकाणी व्हावी, अशी अपेक्षा असते. त्या दृष्टीने त्यांच्याकडून हालचाली होतात. परंतु सामान्य प्रशासनाचे प्रमुख असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांची प्रशासनावरची निसटती पकड, कर्मचारी आणि सामान्य प्रशासनच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेला विसंवाद यामुळे बदली प्रक्रियेकडेच अधिकाऱ्यांची उदासीनता दिसत होती. सकाळी दहाला सुरु होणारी प्रक्रिया उशिरा सुरु झाली आणि दुपारी सभागृहात बदली प्रक्रियेच्या ठिकाणी अधिकारी नव्हते. दुपारनंतर तर ठराव समितीच्या निमित्ताने सर्वच अधिकारी तेथून निघून गेले.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवत असताना नियम व अटी सामान्य प्रशासन विभागाने लावलेल्या आहेत. परंतु ते कागदावरच राहून प्रत्यक्षात ही प्रक्रिया सुरु व्हायलाच उशीर झाल्याने अधिकाऱ्यांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळाली. केवळ गप्प बसून प्रक्रिया पार पडते कधी आणि आपल्या हातात बदलीचे नियुक्ती लेटर मिळते कधी याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा होत्या. दुपारीही उशिराही ठराव समिती बैठकीचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांची प्रक्रियेकडे पाठ होती.
दरम्यान, २० रोजी बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये अर्थ विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन आणि एकात्मिक बाल विकास योजना, प्राथमिक शिक्षण या विभागतील बदल्याची प्रक्रिया पार पडली. या बदल्याच्या प्रक्रियेची नियमावली भली मोठी. ती म्हणजे प्रशासकीय, विनंती, आपसी बदलीसाठी समुपदेशनापूर्वी खातेप्रमुखांनी शासन निर्णयातील धोरणानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम बास्तव्य सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केल्याबद्दलची खात्री करण्यात यावी, बदली पात्र असलेल्या १० वर्षावरील कर्मचाऱ्यांनी बदली धोरणानुसार सुट मिळण्याकरता विनंती केली असल्यास त्या सुटीचे कारण व त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची, संबंधित खाते प्रमुखांनी खात्री करुन घ्यावी, प्रशासकीय, विनंती व आपली बदली पात्र कर्मचाऱ्यांना बदलीचे समुपदेशनाच्या दिवशी उपस्थित रहाण्याचे कळवावे, गटविकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय बदल्याची प्रक्रिया २६ ते २८ मे दरम्यान पार पाडायची आहे.
ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक, आरोग्य विभागाकडील कर्मचारी तसेच शिक्षण विभागाकडील केंद्र प्रमुख या संवर्गाच्या बदल्या १० टक्के व विनंती ५ टक्के प्रमाणात करण्यात याव्यात, सर्व बदल्यांची प्रक्रिया व्हिडीओ शुटींगमध्ये करावी, असे १८ नियम दाखवले गेले असून त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे बोलले जात होते.
- निलेश घुले यांच्याबाबत तीव्र नाराजी
सामान्य प्रशासनाचे कारभारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्याकडे कारभार आहे. निलेश घुले यांच्याकडे कार्यभार आल्यापासून सर्वच ठिकाणचे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आस्थापनाची सर्व कार्यवाहीही त्यांच्याकडूनही होत असल्याने त्यांच्याकडून योग्य ती कामकाज होत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, पदोन्नतीची प्रक्रिया त्यांच्या उदासीन धोरणामुळे रखडल्याची चर्चा आहे








