तालुक्यातील 20 ग्राम पंचायतींचे विकास अधिकारी दहा वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत : कौन्सिलिंग पद्धतीने बदली प्रक्रिया राबविणार
खानापूर : तालुक्यातील 51 ग्राम पंचायतींच्या विकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. यात पाच वर्षाच्या वर एकाच ठिकाणी काम केलेल्या विकास अधिकाऱ्यांची कौन्सिलिंग पद्धतीद्वारे बदली करण्यात येणार आहे. तालुक्यातील 20 ग्राम पंचायतीतील विकास अधिकारी हे एकाच ठिकाणी पाच वर्षापासून अधिक काळापर्यंत सेवा बजावत असल्याने त्यांची बदली अनिवार्य झाली आहे. मात्र काही विकास अधिकारी पुन्हा त्याच पंचायतीत रुजू होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. तालुक्यात एकूण 51 ग्राम पंचायती आहेत.
त्यातील 20 ग्राम पंचायतीतील विकास अधिकारी पाच वर्षाहून अधिक काळापर्यंत एकाच पंचायतीत कार्यरत आहेत. तर तालुक्यात 8 विकास अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे काही विकास अधिकाऱ्यांवर दोन ग्राम पंचायतींचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे 8 विकास अधिकाऱ्यांची नव्याने तालुक्यात नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तालुक्यातील ग्राम पंचायतीतील विकास अधिकारी हे एकाच ठिकाणी तळ ठोकून असल्याने ग्राम पंचायतीच्या विकासाबाबत तसेच नागरिकांच्या शासकीय कामाबाबत तक्रारी आहेत.
तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतीत भ्रष्टाचाऱ्यामुळे चर्चेत आलेल्या आहेत. तर अनेक ग्राम पंचायतींच्या अध्यक्षांवर अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले आहे. तर अध्यक्ष आणि विकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारीही नोंदवल्या गेल्या आहेत. ग्राम पंचायतीच्या तसेच रोजगार हमीच्या योजनात गैरव्यवहार झाल्याच्याही तक्रारी वेळोवेळी झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्राम पंचायती विकासापेक्षा भ्रष्टाचार आणि गैरकारभारामुळे चर्चेत राहिलेल्या आहेत.
विकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे. एकूणच ग्रा.पं.च्या कारभारामुळे खानापूर तालुका ठळक चर्चेत आलेला आहे. काही विकास अधिकाऱ्यांवर निलंबित होण्याच्याही नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ग्रा.पं.च्या विकास अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील जनतेचा भोळेपणाचा फायदा विकास अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतल्याचीही चर्चा आहे. प्रत्येक विकासकामात टक्केवारी ठरलेली असल्याने विकासकामावरही परिणाम झाला आहे.
बदली रद्द करण्यासाठीही प्रयत्न
तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचा मवाळपणा पाहता विकास अधिकारी नव्या कौन्सिलिंग पद्धतीमुळे बदली प्रक्रियेतही वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून त्याच ठिकाणी परत कार्यरत राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. एकाच ठिकाणी तळ ठोकून राहिल्याने विकास अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील जनतेची नस सापडल्याने आपले हित साधून घेण्यात तरबेज झाले आहेत. त्यामुळे पाच वर्षाच्यावर एकाच ग्राम पंचायतीत कार्यरत राहिलेल्या विकास अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेतून होत आहे.









