जिल्हा पंचायत वर्तुळात चर्चा
बेळगाव : राज्य सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर वेगवेगळ्या माध्यमांतून अन्याय केला जात आहे. कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती लादली जात आहे. अशातच जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर हे मराठी भाषिक असल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर हे महाराष्ट्रातील मराठी भाषिक आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये सेवा बजाविली आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये जिल्हा पंचायतीवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे राबवून कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर चांगला वचक ठेवला होता. लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यामुळे कार्यालयात त्यांच्याविरोधात नेहमीच गरळ ओकली जात होती. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून कामानिमित्त आलेल्या नागरिकांशी संवाद साधून समस्यांचे निराकरण करण्याचे तातडीने प्रयत्न करत होते. सीमाभागातील बहुतांश मराठी भाषिक नागरिक समस्या घेऊन आले असताना त्यांच्याशी ते मराठीमध्येच संवाद साधून समस्या निकालात काढत. आलेल्या नागरिकांशी मराठीमध्ये संवाद साधत असल्याचे अनेक अधिकाऱ्यांना खुपत होते. कन्नड संघटनांकडूनही त्यांच्यावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. यामुळेच त्यांच्यावर कन्नडधार्जिन्यांकडून अनेकवेळा आरोप करण्यात आले होते. मराठी भाषिकांना अधिक वाव देतात, असा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या द्वेषातूनच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.









