रत्नागिरी :
जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली आहे. राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात पाटील यांच्याकडून हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात होता. यासंबंधीची चौकशी अपर पोलीस अधीक्षक बी. बी महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कुलदीप पाटील यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात केली आहे.
लगतच्या मिरजोळेतील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात आरोपी दुर्वास पाटील याने वाटद खंडाळा येथील राकेश जंगम याचा खून केल्याची कबुली दिली होती. दुर्वास पाटील, विश्वास पवार व नीलेश भिंगार्डे यांनी ६ जून २०२४ रोजी राकेश जंगम याचा गळा आवळून खून केला. तसेच मृतदेह आंबा घाट येथे नेवून फेकून दिला होता. यानंतर २१ जून २०२४ रोजी राकेशच्या आईने जयगड पोलिसात बेपत्ताची खबर दाखल केली होती. १ वर्ष उलटूनही राकेश जंगमचा शोध जयगड पोलिसाना लावता आला नाही. राकेश जंगम हा दुर्वास पाटीलच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. ६ जून २०२४ रोजी राकेश हा आरोपी दुर्वास पाटीलसोबत कोल्हापूरला जाणार होता. अशी परिस्थिती असतानाही राकेश जंगमचा शोध जयगड पोलिसांना लागला नाही. यामुळे जयगड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. भक्ती मयेकरच्या खूनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राकेश जंगमच्या खूनाचा उलघडा झाला. त्यामुळे जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अपर पोलीस अधीक्षक बी. बी महामुनी यांच्याकडे बेपत्ता राकेश जंगमचा तपास कशाप्रकारे करण्यात आला होता, याची चौकशी लावण्यात आली होती. अखेर या प्रकरणी कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली आहे.
- दुर्वास, विश्वासला न्यायालयीन कोठडी
कळझोंडी येथील सीताराम वीर खून प्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील व विश्वास पवारची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी दोन्ही संशयितांना अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. त्यानुसार बुधवारी दोन्ही संशयितांना न्यायालयापुढे पुन्हा हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली. सीताराम वीर हे दुर्वासची प्रेयसी भक्ती मयेकर हिच्याशी फोनवर अश्लिल बोलत असत. याचा राग दुर्वासच्या मनात धुमसत होता. २९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम हे दुर्वासच्या सायली बार येथे दारु पिण्यासाठी आले होते. यावेळी दुर्वास पाटील, विश्वास पवार व राकेश जंगम या तिघांनी सीताराम यांना मारहाण केली. यात सीताराम यांचा मृत्यू झाला होता, असा आरोप दुर्वास व विश्वास पवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी जयगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर करत आहेत.
- दर्शन पाटील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात
सीताराम वीर खून प्रकरणात अटक केलेल्या दर्शन पाटीलला उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दर्शन पाटील याला सीताराम वीर याच्या खून प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यानंतर दर्शनला अत्यवस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथून अधिक उपचारासाठी त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- दखल…
▶ राकेश जंगम बेपत्ता प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल
▶ नियंत्रण कक्षाचा दिला प्रभार
▶ दर्शन पाटील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात








