नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी कामावर रुजू
खानापूर : खानापूर नगरपंचायतीचे वादग्रस्त मुख्याधिकारी राजू वठारे यांची सोमवारी दुपारी बदलीचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. खानापूर नूतन मुख्याधिकारी म्हणून संतोष कुरबेट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदली आदेशामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यातून समाधान व्यक्त होत असून सर्व कर्मचारी सोमवारी दुपारपासून कामावर रुजू झाले आहेत. खानापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारापदी राजू वठारे यांची जानेवारीत नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारी महिन्यापासूनच आपल्या वादग्रस्त कार्यकीर्दीला सुरवात केली. प्रथम वाजपेयी नगर येथील फलक काढून तो फेकून देण्यात आला होता. त्यानंतर विठ्ठल पाटील या निवृत्त कर्मचाऱ्याचे निवृत्ती वेतनाचे सर्व कागदपत्रे अडवून ठेवली होती. कंत्राट पद्धतीच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून सफाई कामगार म्हणून जाण्याचे आदेश दिले होते.
तसेच सर्व कर्मचाऱ्याबरोबर उद्धट वर्तन अवलंबिले होते. त्यामुळे नगरपंचायतीचा कारभार पूर्णपणे कोलमडला होता. सामान्य नागरिकांच्या कामासाठी आर्थिक पिळवणू होत होती. अशातच सफाई कर्मचाऱ्यांचे चार महिन्यापासून वेतन अडवून त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात होत होता. वारंवार विनंती करुनदेखील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येत नव्हते. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देवून वेतन करण्याची मागणी केली होती. हा राग मनात धरुन सफाई कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी गुरुवार दि. 31 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरु केले होते. याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन मुख्याधिकारी राजू वठारे यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहे. या बदली आदेशानंतर सर्व नगरपंचायत कर्मचाऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. राजू वठारे यांच्या जागी संतोष कुरबेट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बदलीचे आदेश देताना अनेक कारणे नमूद केली आहेत.
राजू वठारे केएटी न्यायालयात दाद मागणार
राजू वठारे हे आपल्या बदलीच्या विरोधात दाद मागण्यासाठी केएटी न्यायालयात धाव घेणार आहेत, असे समजते. जर न्यायालयाने राजू वठारे यांच्या बदलीस स्थगिती दिल्यास पुन्हा राजू वठारे हे मुख्याधिकारी म्हणून कामावर रुजू होणार आहेत.









