राज्यसभेत खासदार इराण्णा कडाडी यांच्या प्रश्नावर उत्तर
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. नागरी वसाहती, तसेच इतर मुद्द्यांबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. कॅन्टोन्मेंटच्या नागरी सीमा या लष्कराच्या जमिनीला लागून असल्याने काही तपशील सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करणे शक्य नाही, असे उत्तर संरक्षण मंत्रालयाच्यावतीने संजय सेठ यांनी दिले. बेळगावचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरणाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील माहिती देण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली असून बंगलो एरियाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये होणारे हस्तांतरण का रखडले? 1 हजार 763 एकर जमिनीपैकी केवळ 112 एकर जागा हस्तांतरित केली जाणार असल्याने नागरिकांच्या सुरू असलेल्या विरोधाचे पुढे काय? तसेच या प्रक्रियेसाठी किती वेळ लागणार? असा प्रश्न खासदार कडाडी यांनी राज्यसभेत उपस्थित केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्यावतीने वरील उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे हस्तांतरणासाठी अद्याप काहीवेळ लागण्याची शक्यता आहे.









