प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा उडणार : तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील 45 शिक्षकांचा समावेश : मराठी शाळांचे भवितव्य पुन्हा टांगणीला
खानापूर : तालुक्यात मुळातच शिक्षकांची मोठ्याप्रमाणात कमतरता आहे. सर्वच शाळा अतिथी शिक्षकांवर चालत आहेत. असलेल्या शिक्षकांवर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तर काही शाळांत शिक्षकच नाहीत. त्यातच नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रियेत तालुक्यातील 60 शिक्षक तालुक्याबाहेर जाणार आहेत. तसेच जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेतही काही शिक्षक बदली होऊन जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या कौन्सिलिंगमध्ये या शिक्षकांनी आपल्याला हवी असलेली शाळा घेतली आहे. येत्या काही दिवसात त्यांना मोकळीक देण्यात येणार आहे. तालुक्यातील शिक्षकांची कमतरता मोठ्याप्रमाणात भासणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा उडणार आहे.
शासनाच्या नियमानुसार गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी कौन्सिलिंग सुरू आहे. यात खानापूर तालुक्यातील 60 मराठी प्राथमिक शिक्षकांची बदली तालुक्याबाहेर करण्यात आली आहे. त्यामुळे या जागी पुन्हा बदली शिक्षक मिळणे कठीण आहे. या 60 शिक्षकांत तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील 45 शिक्षकांचा समावेश आहे. या रिक्त जागेवर कोणताही बाहेरील शिक्षक येण्यास राजी होत नाही. तसेच नवीन शिक्षक या जागेवर भरती करण्यात येत नाही. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकाविना शैक्षणिक नुकसान होणार आहे. तसेच या शाळा कन्नड शिक्षकांच्या हाती गेल्यानंतर तेथे कन्नड शिक्षक पूर्णपणे कन्नड शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतो. सरकार जाणीवपूर्वक तालुक्यातील मराठी शाळा बंद पाडवण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. तालुक्यात मराठी शिक्षकांची पहिल्यापासूनच कमतरता आहे. आणि त्यातच एकाचवेळी 60 शिक्षकांची अन्यत्र बदली झाल्याने प्राथमिक शिक्षणाचा पायाच ढासळणार आहे.
मार्च 2024 पर्यंत बदल्या थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे
कौन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण झाल्याने येत्या आठ दिवसात या शिक्षकांना मोकळीक देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी तालुक्यातील झालेल्या 60 शिक्षकांच्या बदली रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी म. ए. समिती, शाळा सुधारणा समिती, पालक, शिक्षणप्रेमी, मराठी भाषिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून निदान मार्च 2024 पर्यंत या बदल्या थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकदा मोकळीक दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा शिक्षक मिळणे कठीण आहे. त्यासाठी याबाबत गांभीर्याने पाऊल उचलणे आवश्यक आहे.
अतिथी शिक्षकांच्या नेमणुकीसाठी शासनाकडून परवानगीची अपेक्षा
याबाबत गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांना विचारले असता त्या म्हणाल्या, शासनाच्या नव्या नियमानुसार 15 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना कौन्सिलिंग पद्धतीमुळे बदलीसाठी संधी मिळते. पूर्वी 25 टक्के राखीव पद्धत होती. मात्र शिक्षकांसाठी नियम होता. मात्र आता कौन्सिलिंग पद्धतीमुळे त्यांची बदली होऊ शकते. तालुक्यात शिक्षकांची कमतरता भरुन काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. अतिथी शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील नेमणुकीसाठी यादीही पाठविली आहे. मात्र बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळेल, अशी आशा आहे. सध्या जिल्हा अंतर्गत बदलीचे कौन्सिलिंग झाल्यानंतर सर्व बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बदली झालेल्या शिक्षकाला आम्ही थांबवू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यांतर्गत बदलीतही बरेच शिक्षक अन्यत्र जाणार आहेत. यापूर्वी बिदर, भालकी, औराद या ठिकाणचे शिक्षक खानापूर तालुक्यात रुजू झाले होते. त्यांनीही बदली करून घेतल्याने टप्प्याटप्प्याने हे शिक्षक पूर्णपणे इतरत्र गेले आहेत. त्या जागी पुन्हा शिक्षकच देण्यात आले नाहीत. तसेच पुन्हा जिल्ह्यांतर्गत बदलीमुळे बरेच शिक्षक अन्यत्र जाणार आहेत. त्यामुळे या बदली प्रक्रिया थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
पश्चिम भागातील मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात येणार
तालुक्यातील मराठी शिक्षणाचा पायाच या बदली प्रक्रियेमुळे पूर्णपणे ढासळणार आहे. जर हे 60 शिक्षक येत्या चार-पाच दिवसात अन्यत्र आपल्या जागी गेल्यास पश्चिम भागातील मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. कर्नाटक शासन या दुर्गम भागातील मराठी शाळांना नव्याने शिक्षक देण्यास निश्चितच गांभीर्याने घेणार नसल्याने कर्नाटक सरकारचा कुटिल डाव यातून साध्य होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील मराठी शाळांवर गंडातर येणार यात शंकाच नाही. यावर्षी तालुक्यातील पाच मराठी शाळा या ना त्या कारणाने बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या शिक्षकांच्या बदलीनंतरही दुर्गम भागातील शाळांत वेगळी स्थिती नसणार आहे.









