दापोली :
यावर्षी गणेशोत्सवात तालुक्यात फळे, फुले, मोदक मिठाई, सजावटीचे साहित्य, फटाके, कपडे आदींची जोरदार खरेदी झाली. वाढलेली महागाई, पाऊस यामध्ये खरेदीदारांचा उत्साह टिकून राहिल्याने बाजारपेठेत सुमारे १० ते १२ कोटींची उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाच्या सुरुवातीला अनेक समस्या आवासून उभ्या असतानाही ‘विघ्नहर्ता’ बाप्पा व्यावसायिकांना पावला आहे.
गणपती सणानिमित्त मुंबई-पुण्यात कामानिमित्त गेलेले कोकणवासीय आपापल्या गावांकडे परत येतात. शिवाय वर्षातून एकदा येणारा गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह देखील तेवढाच मोठा असतो. अनेक प्रकारच्या खरेदीला जोर चढतो. त्याची सुरुवात गणेशमूर्तीच्या बुकिंगपासून होते. शाडूच्या मातीचे व रंगाचे दर वाढल्याने गणेशमूर्तीच्या किंमतीदेखील वाढल्या होत्या. तालुक्यात ६ हजार ३३५ गणपतींची प्रतिष्ठापना होते. यावर्षी ९ कोटी ५० लाख २ हजार ५०० रुपयांच्या गणेशमूर्तीची खरेदी झाली.
- विविध प्रकारच्या खरेदीला जोर
यानंतर मकर सजावट साहित्याला प्राधान्य दिले जाते. यावर्षी बाजारपेठेत सजावट साहित्यासह तयार मखरे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध होती. त्यांच्या किंमती अडीच ते पाच हजाराच्या घरात होत्या. शिवाय यावर्षी गणपतीआधी झालेल्या पावसामुळे फळेदेखील महाग झाल्याचे समोर आले होते. मात्र गणेशभक्तानी हात आखडता घेतला नाही. सुमारे ५ लाखापर्यंत फळांची विक्री झाली. फुलांच्या बाजारानेही उभारी घेत दीड लाखापर्यंत उलाढाल केली. फटाक्यांची खरेदी ८ ते १० लाख रुपयांपर्यंत झाली. कपड्यांच्या खरेदीनेही यावर्षी जोर धरल्याने सुमारे ८० लाखाची खरेदी झाली. याचबरोबर अगरबत्ती, धूप, गुलाल, विजेची उपकरणे, लाईटसु, मकर सजावटीसाठी लागणारे साहित्य, मोदक, मिठाई, चांदीचे,सोन्याचे दागिने आदी खरेदी लक्षात घेता यावर्षी जवळपास १० ते १२ कोटींच्या घरात उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांमधून समोर आले. तसेच गणपती आणताना व मुख्य म्हणजे गणेश विसर्जनावेळी बॅन्जो, खालूबाजा, लाऊडस्पीकरवर देखील लाखोंची उलाढाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- सोने-चांदी खरेदी मंदावली
गणेशोत्सवात सोने, चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. परंतु यावर्षी महागाईमुळे सोने-चांदीच्या खरेदीवर मोठा परिणाम झाल्याचे सैतवडेकर ज्वेलर्सकडून स्पष्ट करण्यात आले.
- पावसाचा फटका
गणेशोत्सवाच्या सुरुवातीला तसेच गणेशोत्सवातही यावर्षी पावसाने जोर धरला होता. यामुळे सुरुवातीला ग्राहकांनी बाजारपेठेत येण्यास नापसंती दर्शवली, तसेच महागाई व ऑनलाईन खरेदीचाही काही अंशी परिणाम झाला. मात्र या नकारात्मक बाबीनंतरही एकूणच उत्सवात चांगली उलाढाल झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
- उत्साहाला उधाण
तालुक्यात पेण येथून बहुतांश मूर्ती विक्रीसाठी आणल्या जातात. तर काही मूर्तीकार चित्रशाळांमध्ये मूर्ती घडवण्याचे कार्य करतात. यावर्षी देखील सुबक, सुंदर अशा मूर्ती गणेश चित्रशाळांमध्ये पहायला मिळाल्या. विठ्ठल स्वरुप, मोरावर स्वार, फेटावाल्या, खंडोबा आदी अनेक रुपांतील मूर्तीना चांगली मागणी होती. अनेक ठिकाणी समाज प्रबोधनात्मक मकर, सजावट पहायला मिळाली. यामुळे भक्तीमय वातावरणामुळे गणेशोत्सवात उत्साह ओसंडून वाहत होता.








