त्र्यंबोली यात्रेची परंपरा आजही लाईन बझारने जपलीये
कोल्हापूर : छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात असणाऱ्या इन्फंट्रीमधील सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा आजही लाईन बझारने जपली आहे. याच इन्फ्रटीच्या काळात त्र्यंबोली देवीला अर्पण करण्यात आलेल्या मुखवट्याची नोंद ही सापडते.
कोल्हापूरची रक्षण करती देवता म्हणून त्र्यंबोली व मरगाई देवीला राजाराम रायफल्सच्या सैनिकांनी सन 1864 मध्ये मुखवटे अर्पण केले होते. सध्या ठिकठिकाणी डॉल्बीच्या दणदणाट त्र्यंबोली यात्रा होत असली तरी लाईन बझारमधुन मात्र ‘पी ढबाक्‘च्या गजरात तर पोलीस मुख्यालयातून पोलीस वाद्यवृंदाची सुरात पालखी त्र्यंबोलीला जाते.
ब्रिटिशांनी सन 1845 ते 48 च्या दरम्यान आताच्या लाईन बझार येथील स्थानिकांकडून भूखंड घेऊन वसाहत स्थापन केली. या वसाहतीच्या संरक्षणासाठी इन्फंट्री सुरू करण्यात आली, त्यात 800 हून अधिक स्थानिक तरुणांना भरती करुन घेण्यात आले.
आपली ‘रक्षणकर्ती देवता“ म्हणून इन्फंट्रीमधील सैनिकांनी सन 1864 मध्ये त्र्यंबोली व मरगाई देवीला चांदीचे मुखवटे, मासपट्टा, चपला अर्पण केल्या. त्यातील मुखवट्यांवर राजाराम रायफल्स कोल्हापूर यांच्याकडून ‘अर्पण शके 1864 भार 75“ असे नमूद आहे. नंतर शहाजी महाराजांच्या काळात इन्फंट्रीचे ‘शहाजी नगर’ असे नामांतर झाले. येथील वसाहती एका ओळीत होत्या. येथेच बाजार भरत असल्यामुळे या भागाला आता ‘लाईन बझार’ म्हणून ओळखले जाते.
या लाईन बझारची त्र्यंबोली यात्रा आज होणार आहे. या यात्रेचे वैशिष्ट्या असे की आजही ही यात्रा ‘पी ढबाक“ च्या गजरात आणि लाईन बझार या परिसरासाठी निवड केलेल्या सरपंचांच्या उपस्थित होते. तसेच शहाजी नगर परिसरातील दसरा मैदानावर होणाऱ्या सीमोल्लंघन सोहळ्याचा पहिला मान याच सरपंचांना आहे.
या लाईन बझार आणि परिसरात अनेक संस्थानकालीन वास्तू आहे. रिसाला म्हणजे आताचे एसआरपी कॅम्प, भगवा चौकातील पोलिसांची शाळा, ब्रिटिशकालीन रेसिडेन्सियल निवासस्थान सध्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान, इन्फंट्री पोलिस लाईन म्हणजे पोलीस मुख्यालय, कवायत मैदानावर सध्या महासैनिक दरबार हॉल आहे, इंदुमती राणी सरकारांचा वाडा सध्याचे शासकीय विश्रामगृह, लक्ष्मी–विलास पॅलेस, घोड्याच्या पागा, राऊंडाचा माळ व कवट्याचा माळ म्हणजे शेतकी फार्म आदी संस्थानकालीन वास्तु या परिसरात आज ही सुस्थितीत आहेत.
ही त्र्यंबोली यात्रा करण्यासाठी आजही येथील नागरिकांकडून देवीचा कौल घेतला जातो. त्यासाठी आषाढ महिन्याच्या पंधरा दिवस आधी जुनी जाणकार मंडळी त्र्यंबोली टेकडीवर जातात. देवस्थान समितीच्या काही कागदपत्रात त्र्यंबोली यात्रा ही राजाराम रायफल्स मधील सैनिकांनी करावी. त्याच बरोबर सध्याच्या दक्षिणमुखी हनुमान मंदीरातील दिवाबत्तीचा खर्च हा कवट्याचं रान (सध्याचे शेतकी फार्म) व मारुती देवालयामागील जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून करावा, अशी नोंद आहे.
नंतर इन्फंट्रीच्या पगारातून रक्कम वजा केली जायची. पुढे घरटी महिना एक आणा वर्गणी गोळा केली जायची. या सर्व नोंदी हिंदू समाजाच्या सन 1968-71 या काळात नोंद आहेत. सध्या ही यात्रा लाईन बझार मधील हिंदु समाजांच्या वतीने व पोलीस मुख्यालयातील कर्मचारीवर्ग व त्याच्या कुटुंबासह केली जाते. पोलीस मुख्यालयातील पालखी ही वसाहतीत पोलीस वाद्यवृंदाच्या गजरात फिरुन ड्रिल शेड येथे येते व त्याठिकाणी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुजा केल्यानंतर पालखी पुढे टेंबलाई टेकडीकडे जाते.
रक्षणकर्ती देवता
या वसाहतीतील सैनिक आणि त्याच्या कुटुंबासह इतर सर्वाची रक्षण करणारी देवता म्हणून आजही पोलीस मुख्यालयाच्या चारही कोपर्यात त्र्यंबोली देवीची चार मंदीरे आहेत.
चरक शिंपडणे
त्र्यंबोली यात्रेच्या दिवशी पोलीस मुख्यालय व लाईन बझार वसाहतीत सभोवती आजही चरक शिंपडला जातो. हा चरक शिंपडणे म्हणजे आंबील घुगऱ्या, दहीभात पाणी हे शिंपडले जाते.








