खेड :
कोकण मार्गावर रविवारपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, पावसाळी वेळापत्रकाच्या पहिल्याच अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. ‘जबलपूर-कोईमतूर’ला तब्बल 10 तासांचा लेटमार्क मिळाला. अन्य 13 रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवासी खोळंबले. ‘विकेंड’ला उशिरा धावलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसाळी वेळापत्रकाच्या अंमलबजावणीनुसार 20 ऑक्टोबरपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार आहे.
रोहा ते ठोकूरदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास रेल्वेगाड्या ताशी 40 कि. मी. वेगाने चालवण्याचे निर्देश लोकोपायलटना देण्यात आले आहेत. नागपूर-मडगाव स्पेशल 2 तास तर सावंतवाडी-दिवा पॅसेंजर 1 तास 20 मिनिटे उशिराने धावली. सीएसएमटी-मंगळूर एक्स्प्रेस 1 तास 40 मिनिटे तर एलटीटी-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस 2 तास विलंबाने मार्गस्थ झाली. गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस 1 तास 30 मिनिटे, एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस 2 तास, ओखा एक्स्प्रेस 1 तास 50 मिनिटे, तिरुवअनंतपूरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस 2 तास 10 मिनिटे, सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस 1 तास 30 मिनिटे, एलटीटी-कोच्युवेली द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस 3 तास, कोईमतूर-हिस्सार वातानुकूलित एक्स्प्रेस 1 तास 45 मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली.
- प्रवाशांनी गाडीची वेळ तपासूनच प्रवास करावा
कोकण मार्गावर 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. पुढील दोन-तीन दिवस काही प्रवाशांचा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचवेळा प्रवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वादही घालतात. ही कटूता टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी प्रवास करत असताना गाडीची वेळ तपासून घेत प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.








