आंध्रातील रेल्वे अपघाताला मोटरमनचे दुर्लक्ष कारणीभूत : मृतांचा आकडा 14 वर, 100 हून अधिक जखमी
► वृत्तसंस्था/ विजयनगरम
आंध्रप्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातामागील नेमके कारण स्पष्ट झाले आहे. एक्स्प्रेसच्या इंजिनचालकाने (मोटरमन) सिग्नल तोडून पुढे मार्गक्रमण चालू ठेवल्यामुळे प्रवासी रेल्वे समोरच्या दुसऱ्या एक्स्प्रेसला धडकल्याची माहिती सोमवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली. तसेच या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या दुर्घटनेमुळे जून महिन्याच्या प्रारंभी ओडिशा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
आंध्रप्रदेशमध्ये हावडा-चेन्नई मार्गावर विशाखापट्टणम-पलासा प्रवासी रेल्वे आणि विशाखापट्टणम-रायगडा एक्स्प्रेसमध्ये टक्कर झाल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले. या अपघातात पाच डब्यांचे नुकसान झाले आहे. बचावकार्य सुरू असून स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. अपघात निवारक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सोमवारी दिवसभर अडथळे दूर करून रेल्वेमार्ग ठिकठाक करण्याचे कार्य सुरू होते. या अपघातामुळे आतापर्यंत एकूण 18 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 22 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.
आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे झालेल्या रेल्वे अपघातापूर्वी विशाखापट्टणम-रायगड टेनच्या लोको पायलटने चुकून रेड सिग्नल ओलांडल्यामुळे ही टेन विशाखापट्टणम-पलासा टेनला धडकली. यावेळी दोन्ही प्रवासी रेल्वे एकाच ट्रॅकवर होत्या. अपघातावेळी दोन्ही गाड्यांमध्ये ‘कवच’ यंत्रणा नव्हती, असे रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. त्यानंतर अपघाताची माहिती मिळून मदतकार्य सुरू होण्यास रात्र झाली होती. सोमवारी दुसऱ्या दिवशी अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य पूर्ण झाले आहे. आता ट्रॅकवर रेल्वेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यावर भर दिला जात असल्याचे ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ बिस्वजित साहू यांनी सांगितले. अपघातामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी बस आणि टेनची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख ऊपये, गंभीर जखमींना 2.5 लाख ऊपये आणि मध्यम जखमींना 50 हजार ऊपयांची मदत रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
पंतप्रधान, रेल्वेमंत्र्यांनी घेतला आढावा
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संपूर्ण अपघातस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी वैद्यकीय यंत्रणांना दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करत घटनास्थळारील परिस्थितीचीही माहिती घेतली. पंतप्रधानांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख ऊपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार ऊपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची दक्षता
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रे•ाr यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत अधिकाऱ्यांना जखमींना मदत करण्याचे आदेश दिले. आंध्रप्रदेशच्या सीएमओच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आणि विजयनगरमच्या जवळील जिल्हे विशाखापट्टणम आणि अनकापल्ले येथून शक्मय तितक्मया ऊग्णवाहिका पाठवण्याचे आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी जवळच्या ऊग्णालयांमध्ये योग्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले. जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि महसूलसह अन्य विभागांमध्ये समन्वय ठेवण्याचे आदेश दिले होते.









