पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांसाठी विशेष वर्ग
बेळगाव : अमलीपदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कारवाई केल्यानंतर आता कारवाई व्यवस्थित व्हावी, यासाठी पोलीस अधिकारी व पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल होणारे गुन्हे कसे हाताळावेत, यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवृत्त डीडीपी ए. ए. पारशेट्टी यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यशाळेत शहरातील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस स्थानकात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणारे पोलीस सहभागी झाले होते. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा-1985 अन्वये दाखल होणारे गुन्हे कशापद्धतीने दाखल करावेत. यावेळी कोणत्या नियमांचे पालन करावे? आदींविषयी त्यांना कायदेशीर माहिती देण्यात आली. न्यायालयात अशा प्रकरणातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.









