महापालिकेच्या महसूल विभागाचा पुढाकार : एक दिवसाचे प्रशिक्षण
बेळगाव : ई-आस्थीसाठी मिळकतधारकांना यापुढे बेळगाव वन केंद्रातून अर्ज करावे लागणार आहे. त्यामुळे बेळगाव वन केंद्रातील ऑपरेटर्सना कशाप्रकारे अर्ज स्वीकारावेत, याबाबत महानगरपालिकेकडून शुक्रवारी प्रशासकीय इमारतीत प्रशिक्षण देण्यात आले. एक दिवसाच्या प्रशिक्षणाला शहरातील चारही बेळगाव वन केंद्रातील कॉम्प्युटर ऑपरेटर्स उपस्थित होते. महानगरपालिकेकडून शहरातील मिळकतधारकांना ई-आस्थी प्रणालीअंतर्गत नोंद करून घेऊन ‘ए’ व ‘बी’ खात्याचे वितरण केले जात आहे. ‘ए’ खाता वितरण ही प्रक्रिया कायमस्वरुपी असून ज्या मिळकती अनधिकृत आहेत पण त्यांची उपनोंदणी कार्यालयात नोंद आहे. अशा मिळकतींना ‘बी’ खाता दिला जात आहे. महानगरपालिकेकडून ही सर्व प्रक्रिया राबविली जात आहे. महापालिकेच्या अशोकनगर, कोनवाळ गल्ली आणि गोवावेस येथील विभागीय कार्यालयामधून ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारले जात होते. त्यानंतर संबंधितांना खात्याचे वितरण करण्यात येत होते, पण याठिकाणी गैरकारभार वाढण्यासह एजंटांचा वावर वाढल्याचा आरोप केला जात आहे.
मनपा आयुक्त शुभा बी. यांनी केलेल्या अचानक पाहणीवेळी विभागीय कार्यालयातील अनागोंदी कारभार समोर आला होता. त्यामुळे केवळ कोनवाळ गल्ली व गोवावेस कार्यालयातून ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारले जात होते. तर अशोकनगर कार्यालयात अर्ज स्वीकारणे बंद करून महापालिकेच्या मुख्य कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर आता शहरातील चारही बेळगाव वन केंद्रांमध्ये ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याबाबतचा आदेश मनपा आयुक्तांनी गत आठवड्यात जारी केला आहे. ई-आस्थीसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत व त्यांचे कशा पद्धतीने स्कॅनिंग करून ऑनलाईन अपलोड करावे, याबाबतची माहिती बेळगाव वन केंद्र्रातील कॉम्युटर ऑपरेटर्सना जरुरीचे होते. त्यानुसार शुक्रवारी महसूल विभागाच्यावतीने प्रशासकीय इमारतीत स्क्रिनच्या माध्यमातून कॉम्युटर ऑपरेटर्सना सर्व माहिती देण्यात आली. मात्र बेळगाव वन केंद्रात मनुष्य बळ कमी असण्यासह सध्या उपलब्ध प्रिंटर्स आणि कॉम्प्युटर्स व्यवस्थितरित्या काम करत नाहीत. अशी तक्रार आहे. त्यामुळे ई-आस्थीसाठी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्यास बराच वेळ जाणार असल्याने नवीन यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही केली जात आहे.
एक दिवसाचे प्रशिक्षण
महापालिका आयुक्तांच्या सुचनेनुसार यापुढे बेळगाव वन केंद्रातून ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी आवश्यक ती कागदपत्रे व कशा पद्धतीने स्कॅनिंग करून ती अपलोड करावेत, याबाबत शुक्रवारी शहरातील सर्व बेळगाव वन केंद्रातील कॉम्प्युटर्स ऑपरेटर्सना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.
– रेश्मा तालीकोटी, महसूल उपायुक्त









