बेरोजगार महिलांना प्रोत्साहन : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बेरोजगार नागरिकांना रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी बागायत खात्यामार्फत आळंबी उत्पादनाचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि बागायत खाते यांच्या सहयोगाने लोंढा येथील हायस्कूलमध्ये आळंबी उत्पादन प्रशिक्षण पार पडले. यावेळी बागायत खात्याच्या अधिकारी नेत्रांजली भोसले यांनी आळंबी उत्पादन कसे करावे आणि त्यापासून स्वयंरोजगार कसा मिळवावा. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आळंबी उत्पादन हे घर बसल्या केवळ 100 रुपयांपासून करता येते. बेरोजगार महिलांनी आळंबी उत्पादन करून आर्थिक उत्पन्न निर्माण करावे, असे सांगितले. याबरोबर आळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिके दाखवून गृहिणी आणि इतर महिलांसाठी हा व्यवसाय उत्तम असल्याचे स्पष्ट केले.
इच्छुकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
बागायत खात्यामार्फत आळंबी उत्पादनाचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन कृत्रिम आळंबी तयार करून व्यवसाय करावा, असे आवाहनदेखील केले. यावेळी खानापूर, नंदगड, लोंढा येथील 50 हून अधिक महिला उपस्थित होत्या. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 8904381481 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.









