बेळगाव : बागायत खात्यातर्फे कृत्रिम अळंबी तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. बेरोजगार तरुण आणि महिलांचा याला उदंड प्रतिसाद मिळाला. क्लब रोड-ह्यूम पार्क येथील अळंबी प्रशिक्षण केंद्रात महिलांना अळंबीबाबत अधिक माहिती देण्यात आली. बागायत खात्याच्या साहाय्यक निर्देशिका नेत्रांजली भोसले यांनी कृत्रिम अळंबी कशी तयार करावीत आणि यातून स्वयंरोजगार कसा निर्माण करावा, याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. शिवाय प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. केवळ 100 रुपयांत या व्यवसायाला सुरुवात करता येते. अळंबी उत्पादन करून त्यांची हॉटेल व इतर ठिकाणी विक्री करता येते. बेरोजगार महिलांना घरबसल्या हा व्यवसाय करता येतो. शिवाय खात्यामार्फत प्रशिक्षण मोफत दिले जात आहे.
अलीकडे बेरोजगारांची संख्या वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम अळंबी उत्पादन अनेकांना आधार ठरणार आहे. केवळ घरच्या घरी हा व्यवसाय करता येणार आहे. यासाठी लागणारे बी बागायत खात्याकडून दिले जाते. पातळ प्लास्टिक पिशवी, पिंजर व त्यामध्ये बियाणांची गरज असते. एका बंद खोलीत हे ठेवल्यानंतर काही दिवसांनी त्यातून अळंबी बाहेर येतात. त्यामुळे हा व्यवसाय महिलांना सोयिस्कर ठरू शकतो. याबाबत अधिक माहितीसाठी 8904381481 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बागायत खात्यातर्फे करण्यात आले आहे.









