पुणे / प्रतिनिधी :
पुणे पोलिसांनी पकडलेल्या इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉंबस्फोटाचा सराव केला असून, त्यासाठी हे दहशतवादी जंगलात तंबू ठोकूनही काही दिवस राहिले असल्याचे समोर आले आहे. पुण्यात पानशेतजवळ, सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडीमध्ये, तर कोल्हापूर परिसरातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण व सराव केल्याची खळबळजनक माहितीही तपासातून पुढे आली आहे.
पुण्यातील कोथरूड भागात मध्यरात्री दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. अधिक तपासात मोहम्मद युसूफ खान, मोहम्मद युनूस साकी हे दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या फ्लॅटमध्ये पोलिसांना इसिससंबंधित साहित्य आणि स्फोटकांची पावडर सापडली. मात्र, मोहम्मद शाहनवाज आलम हा तिसरा दहशतवादी या वेळी पळून जाण्यात यशस्वी ठरला. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस साकी यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
संबंधित दहशतवादी सीमाभागातील निपाणी आणि संकेश्वरमध्ये काही दिवस मुक्कामाला होते. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरातील जंगलात त्यांनी ट्रेनिंग घेतले, सराव केला. पोलिसांनी या जंगलांमध्ये जाऊन या दहशतवाद्यांनी केलेल्या सरावानंतर त्या ठिकाणी मागे राहिलेले अवशेष जप्त केले आहेत. त्याचबरोबर जंगलात राहण्यासाठी वापरण्यात आलेले तंबूदेखील पोलिसांनी हस्तगत केले असून, पोलिसांना अनेक धागेदोरे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.