मराठी माध्यमाचे प्रशिक्षण साहित्य तयार नसल्याने वेळ लागण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने ते भरून काढण्यासाठी यावषी शिक्षण विभाग लर्निंग रिकव्हरी प्रोजेक्ट (सेतुबंध) घेणार आहे. यासाठी शालेय शिक्षकांना शिक्षण विभागाच्यावतीने प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्हय़ातील कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, मराठी माध्यमाच्या शिक्षकांना अद्याप प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यावषी 15 दिवस अगोदर शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे. 16 मे पासून शाळा सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सेतुबंध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने पुस्तिकाही तयार केली आहे. पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना सेतुबंधांतर्गत शिकविले जाणार आहे. बरेच विद्यार्थी पुढील वर्गात गेले असले तरी त्यांना ज्ञान नसल्याने सेतुबंध घेतला जाणार आहे.
मागील वर्गांच्या उजळणीबाबत मार्गदर्शन
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात शालेय शिक्षकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत 3 बॅचमध्ये कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी कन्नड माध्यमांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना साहित्य उपलब्ध करून दिले जात असून कशा पद्धतीने मागील वर्गांची उजळणी घ्यावी या विषयी त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
मराठी शिक्षकांना आठवडय़ाच्या अखेरीस प्रशिक्षणाची शक्यता
मराठी माध्यमाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी अजुन काही कालावधी लागण्याची शक्मयता आहे. मराठी माध्यमाचे प्रशिक्षण साहित्य अद्याप तयार नसल्याने प्रशिक्षणासाठी वेळ लागत आहे.
या आठवडय़ाच्या अखेरीस मराठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची शक्मयता आहे. त्यामुळे बेळगाव शहर, ग्रामीण व खानापूर येथील मराठी शिक्षकांना प्रशिक्षणासाठी अजुन काही दिवस वाट पहावी लागणार आहे. मराठीसोबतच उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनाही अद्याप प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
खासगी-विनाअनुदानित शिक्षक अनभिज्ञ
शाळा सुरू होण्यास 5 दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप खासगी व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. आतापर्यंत राज्यातील 50 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून उर्वरित 24 हजार 500 हून अधिक खासगी व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभाग काय निर्णय घेणार याकडे साऱयांचेच लक्ष लागून आहे.









