वृत्तसंस्था/ रतलाम
मध्यप्रदेशात रतलाम विभागात रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशीरा या भागात एक मालगाडी रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेचा फटका संपूर्ण उत्तर भारतातील रेल्वे वाहतुकीला बसला होता. मात्र, आता रेल्वेमार्गावरील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मालगाडी रुळावरुन घसरल्याने 15 महत्वाच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. रतलाम रेल्वे विभाग हा पूर्व भारत आणि पश्चिम भारत यांना रेल्वेने जोडणारा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे रेल्वे घसरल्याची घटना घडल्यानंतर त्वरित आपत्कालीन साहाय्यता पथके येथे पाठविण्यात आली होती. आठ तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.









