दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू : चालकासह अन्य सहाजण जखमी
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या कु•ालोर जिह्यातील सेम्मनकुप्पम गावात मंगळवारी सकाळी एक स्कूलबस रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना मोठी दुर्घटना घडली. रेल्वेच्या धडकेत स्कूलबसचा चेंदामेंदा झाला आहे. तसेच या अपघातात 3 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. चालकासह अन्य सहा जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे गेटकीपरला निलंबित करण्यासोबतच अटकही करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दक्षिण रेल्वेने या दु:खद घटनेबद्दल माफी मागितली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कु•ालोर जिह्यातील सेम्मनकुप्पम गावात सकाळी 7:45 वाजता हा अपघात घडला. एक स्कूलबस रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना विल्लुपुरम-मयिलादुथुराई पॅसेंजर ट्रेन (ट्रेन क्रमांक 56813) स्कूलबसला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की 3 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे स्कूलबसला धडकल्यानंतर ती रेल्वे क्रॉसिंगपासून काही अंतरावर पडली. काही अंतर गेल्यानंतर लोको पायलटने ट्रेन थांबवून संबंधित रेल्वे कक्षाला यासंबंधी माहिती दिली.
प्राथमिक चौकशीअंती दक्षिण रेल्वेने या अपघाताबाबत माहिती जारी केली. त्यानुसार, सुरुवातीला रेल्वेगेट बंद होती. मात्र, स्कूलबस चालकाने विलंब टाळण्यासाठी गेट उघडण्याचा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. गेटकीपरने नियम आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन करत स्कूलबसला गेट ओलांडण्याची अनुमती दिली. गेटकीपरने नियमांनुसार गेट उघडणे अयोग्य असल्यामुळे सध्या गेटकीपरविरुद्ध गुन्हेगारी निष्काळजीपणाबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच गेटकीपरला अटक करण्यात आल्याचे रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, व्हॅनचालक आणि एका जखमी विद्यार्थ्याने गेट उघडीच असल्याचा दावा केला आहे.
अपघात पाहिल्यानंतर पीडितांना मदत करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला तुटलेल्या विद्युततारेचा धक्का बसला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेने जीवितहानी आणि जखमींबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत या दु:खद घटनेबद्दल माफी मागितली. रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.









