रेल्वेस्थानकावर नागरिकांची प्रचंड गर्दी : वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी धडपड
बेळगाव : गणेशोत्सवासाठी गावी आलेले भाविक पुन्हा महानगरांमध्ये परतत असल्यामुळे रेल्वे तसेच बससेवा फुल्ल झाली आहे. रविवारी सकाळी बेळगाव रेल्वेस्थानकावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. मुंबई, पुणे, बेंगळूर, हैद्राबाद शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त कार्यरत नागरिक गणेशोत्सवासाठी बेळगावमध्ये परतले होते. चार दिवस गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर रविवारी पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देत पुन्हा महानगरांमध्ये परतणे पसंत केले. त्यामुळे सर्व एक्स्प्रेस पूर्ण क्षमतेने भरून जात होत्या.
वंदे भारतला प्रवाशांची प्रचंड गर्दी
रविवारी सकाळी बेळगावहून पुण्याला गेलेल्या वंदे भारतमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. पूर्ण क्षमतेचे बुकिंग होऊन तात्काळ तिकीट काढावे लागले होते. अशीच परिस्थिती सायंकाळी मुंबईला जाणाऱ्या हुबळी-दादर व पुदुच्चेरी-दादर, वास्को-निजामुद्दीन, बेळगाव-बेंगळूर, राणी चन्नम्मा एक्स्प्रेस यांच्याबाबतही दिसून आली. बसस्थानकावरही मोठ्या महानगरांच्या बससेवा पूर्ण क्षमतेने भरून जात होत्या.









