रोमान्स अन् कॉमेडीच्या धाटणीचा चित्रपट
वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’चा मनोरंजनाने भरलेला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये कॉमेडी आणि रोमान्सचा फूल डोस दिसून येत आहे. ट्रेलरद्वारे या चित्रपटाच्या कहाणीविषयी देखील कळते.
वरुण धवन आणि सान्या मल्होत्रा यांच्या व्यक्तिरेखा रिलेशनशिपमध्ये असतात तर जान्हवी कपूर आणि रोहित सराफ यांच्या व्यक्तिरेखा कपल असतात. परंतु नंतर असे काही घडते की रोहित अन् सान्याच्या व्यक्तिरेखांचा विवाह ठरतो. आता स्वत:च्या एक्सला दाखवून देण्यासाठी आणि त्यांचा विवाह मोडण्यासाठी वरुण आणि जान्हवी मिळून नवनवे मार्ग अवलंबित असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसून येते. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
शशांक खेतान हा दिग्दर्शक वरुण धवनसोबत मिळून पुन्हा रोमँटिक-कॉमेडी धाटणीचा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट घेऊन आला आहे. ट्रेलरमध्ये वरुणचा पुन्हा जुना अंदाज दिसून आला आहे. करण जौहरकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटात वरुण, जान्हवीसोबत सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकार दिसून येणार आहेत.









