यामी गौतम अन् इमरान हाशमी मुख्य भूमिकेत
आम्ही मुस्लीम महिला नाही, हिंदुस्थानच्या मुस्लीम महिला आहोत. याच मातीत लहानाच्या मोठ्या झालो आहोत. याचमुळे कायद्याने देखील आम्हाला त्याच नजरेने पहावे, ज्याप्रकारे उर्वरित हिंदुस्थानींना पाहतो’ अशा आशयाचा संवाद असलेला ‘हक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तीन तलाक विरोधात शाह बानो यांच्या ऐतिहासिक लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. न्यायालयात पाणावलेल्या डोळ्यांसह स्वत:च्या ‘हक’साठी लढत असलेल्या शाजियाच्या व्यक्तिरेखेत यामी गौतम असून तिचा पती अब्बासच्या व्यक्तिरेखेत इमरान हाशमी धर्माचा दाखला देत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
दिग्दर्शक सुपर्ण एस. वर्मा यांच्या हक चित्रपटाच्या ट्रेलरने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येक शिक्षा आणि कायदा केवळ महिलांसाठीच का राखीव आहे, पुरुष याच्या प्रभावापासून का वाचलेत, असा प्रश्न या चित्रपटातून उपस्थित करण्यात आला आहे.
1985 च्या ऐतिहासिक अणि वादग्रस्त शाह बानो प्रकरणावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये या कायदेशीर लढाईवरून स्क्रीनवर एक प्लेकार्ड दिसते, ज्यावर ‘जब चुप्पी टूटी, तो इतिहास हमेशा के लिए बदल गया’ असे नमूद आहे. चित्रपटात यामी आणि इमरानसोबत वर्तिका सिंह, दानिश हुसैन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी कलाकार दिसून येतील. चित्रपटाची कहाणी अन् संवादलेखन रेशु नाथ यांनी केले आहे. तर संगीत विशाल मिश्रा यांनी दिले आहे. ‘हक’ हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









