नागा चैतन्य-साई पल्लवी मुख्य भूमिकेत
नागा चैतन्यचा चित्रपट ‘थंडेल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात एका मच्छिमाराची कहाणी दर्शविण्यात आली आहे. या मच्छिमाराला आंतरराष्ट्रीय समुद्रात पाकिस्तानी नौदल पकडत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात अॅक्शनने युक्त दृश्यं, संघर्ष अन् भावनांचा कल्लोळ दिसून येणार आहे.
या चित्रपटात संदीप आर. वेद हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. एक रोमँटिक थ्रिलर असण्यासोबत थंडेल हा चित्रपट दमदार संवाद, देशभक्तीची भावनाने नटलेला आहे. ट्रेलर पाहून चाहते आतापासूनच हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. पुष्पा चित्रपटापेक्षा हा चित्रपट यशस्वी ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नागा चैतन्यचा यातील अभिनय कौतुक मिळवत असून साई पल्लवीने स्वत:च्या चार्मने प्रत्येकाची मने जिंकली आहेत. नागा चैतन्य आणि साई यांची जोडी प्रेक्षकांना पसंत पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागा चैतन्य आणि साई यांनी ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटात एकत्र काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. चंदू मोंडेती यांच्या दिग्दर्शनात तयार थंडेल हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती गीता आर्ट्स या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे.









