युद्धग्रस्त इराकची पार्श्वभूमी असणारी कहाणी
स्वत:च्या उत्तम अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारी नुसरत भरुचा सध्या ‘अकेली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात युद्धग्रस्त इराकमध्ये अडकून पडलेल्या भारतीय युवतीची कहाणी दर्शविण्यात आली आहे.

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या कैदेत असलेल्या युवतीची भूमिका नुसरतने यात साकारली आहे. मोसुल या शहरात नोकरी करण्यासाठी गेलेली युवती युद्धामुळे तेथे अन्य महिलांसोबत दहशतवाद्यांच्या तावडीत सापडत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. शारीरिक अन् लैंगिक शोषणाला तोंड दिल्यावरही हार न मानणाऱ्या युवतीच्या भूमिकेत नुसरत दिसून येणार आहे. अकेली या चित्रपटात नुसरतसोबत निशांत दहिया, त्साही हलेवी, अमीर बुतरस हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दशमी स्टुडिओजकडून निर्मित हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणय मेश्रामने केले आहे. नुसरत यापूर्वी सेल्फी या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात नुसरतसोबत अक्षय कुमार अन् इमरान हाश्मी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.









