कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात ती अॅक्शन अवतारात दिसून येणार आहे. भारतीय वायुदलाच्या दिनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. कंगनाच्या या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते अत्यंत आतुरतेने करत आहेत. तेजसमध्ये कंगना ही वायुदलाच्या लढाऊ वैमानिकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
तेजस चित्रपटात कंगनाला प्रखर, उत्साहाने भरपूर वैमानिक तेजस गिल या व्यक्तिरेखेत दाखविण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये हाय ऑक्टेन स्टंट आणि मनं जिंकणाऱ्या संवादाची झलक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केले असून याची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून करण्यात आली आहे. तेजस हा भारताचा पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. एका भारतीय हेराला पाकिस्तानने पकडल्यावर तेजस गिल त्याच्या मुक्ततेसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सामील होत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. या मोहिमेत तेजस गिलसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. कंगनाने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आता आकाशातून वार होईल, आता युद्धाची घोषणा होईल’ असे तिने कॅप्शनदाखल नमूद पेले आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वैमानिकाची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने 4 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण प्राप्त केले आहे.









