कंगना रनौतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘चंद्रमुखी 2’ चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चेन्नईतील एका मोठ्या सोहळ्यात हा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. चित्रपटात कंगना एका नृत्यांगनाच्या भूमिकेत आहे. एक संयुक्त कुटुंब एका आलिशान महालात राहण्यासाठी जात असल्याचे ट्रेलरच्या प्रारंभी दाखविण्यात आले आहे. परंतु या कुटुंबाला महालाच्या दक्षिण दिशेत असलेल्या हिस्स्यात जाण्यास मज्जाव आहे. या हिस्स्यात चंद्रमुखी कैद असल्याचे या कुटुंबाला सांगण्यात येते. यानंतर चित्रपटाच्या कथेत घडणारे अनेक बदल प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारे आहेत. चंद्रमुखी 2 हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित चंद्रमुखी या चित्रपटाचा सीक्वेल आहे. हा एक कॉमेडी हॉरर चित्रपट असून तो एका कन्नड चित्रपटाचा अधिकृत रिमेक होता. चंद्रमुखी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होते.
चंद्रमुखी 2 हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन पी. वासू यांनी केले आहे. कंगना रनौत आणि राघव लॉरेन्स यांच्यासोबत वेदीवेलू, राधिका सरतकुमार, लक्ष्मी मेनन, श्रुती डांगे, महिमा नांबियार, राव रमेश, सुरेश मेनन आणि सुभिक्षा कृष्णन हे कलाकार दिसून येणार आहेत.









