‘हिसाब बराबर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात आर. माधवन एका प्रामाणिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसून येत आहे. तो राधे मोहन शर्मा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. राधे हा हिशेबात तरबेज असून जिद्दी देखील आहे. यातून एका मोठ्या वित्तीय घोटाळ्याचा पर्दाफाश करतो. हा घोटाळा करणाऱ्यांना तो कसा सामोरा जातो यावरच या चित्रपटाची कहाणी बेतलेली आहे.
आर. माधवनचा हा चित्रपट 24 जानेवारी रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ, तेलगू भाषेतही प्रेक्षकांना पाहता येईल. याचे दिग्दर्शन अश्विनी धीर यांनी केले आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक दमदार संवाद ऐकू येतात. यातील एक संवाद माधवनच्या तेंडी असून यात तो ‘ये नया इंडिया है सर जी, छोडेगा नहीं, सबका करेगा हिसाब बराबर’ म्हणताना दिसून येतो. तसेच चित्रपटात विनोदाचीही खुमासदार पेरणी करण्यात आली आहे.
चित्रपटात माधवनसोबत नील नितिन मुकेश देखील मुख्य भूमिकेत आहे. यात तो घोटाळा करणाऱ्या इसमाची व्यक्तिरेखा साकारत आहे. टीव्ही अभिनेत्री रश्मि देसाईने यात छोटी भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री कीर्ति कुल्हारीने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.









