आयुष्मान खुराना पुन्हा आगळ्यावेगळ्या भूमिकेत
आयुष्मान खुरानाचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ड्रीमगर्ल 2’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर खरोख्राच अत्यंत मनोरंजक आहे. पूजा या व्यक्तिरेखेत आयुष्मान असून अन्नू कपूर आणि अभिषेक बॅनर्जी यांचा अभिनयही लक्ष वेधून घेत आहे.
ड्रीमगर्ल 2 मध्ये आयुष्मान अन् अनन्या पांडे हे जोडी दिसून येणार आहे. ड्रीमगर्ल 2 मध्ये अत्यंत

मजेशीर संवाद असून त्याची झलक ट्रेलरमध्ये दिसून येते. आयुष्मान अन् अन्नू कपूर हे यात पितापुत्राच्या भूमिकेत आहेत. यावेळी आयुष्मानच पूजा असल्याचे अन्नू कपूरच्या व्यक्तिरेखेला माहित असल्याचे दाखविण्यात आले आहे.
या चित्रपटात परेश रावल, अन्नू कपूर, अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंह, राजपाल यादव, मनोज जोशी, सीमा पाहवा आणि विजय राज समवेत अनेक कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटावरून आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. उत्तम कलाकार अन् राज शांडिल्य यांच्या प्रभावी दिग्दर्शनामुळे हा चित्रपट यशस्वी ठरणार अशी अपेक्षा असल्याचे निर्माती एकता कपूरने म्हटले आहे.
ड्रीम गर्ल 2 प्रारंभापासूनच जॉयराइड राहिला आहे. पटकथा हसविणारी असून मी पुन्हा एकदा स्वत:च्या चाहत्यांच्या आयुष्यात हास्य अन् मनोरंजन पसरविण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया आयुष्मानने व्यक्त केली आहे. अनन्या पांडेचा आयुष्मानसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. ड्रीमगर्ल 2 मध्ये काम करणे अत्यंत मजेशीर अनुभव होता असे अनन्याचे सांगणे आहे. ड्रीमगर्ल हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.









