प्राइम व्हिडिओने स्वत:चा आगामी चित्रपट ‘अ मिलियन माइल्स अवे’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट एक सत्यघटनेवर आधारित असून यात मायकल पीना हा जोस हर्नांडेजची भूमिका साकारणार आहे. जोस हा अंतराळात जाणार पहिला मेक्सिकन शेतकरी होता. नासाचा अंतराळवीर जोस हर्नांडेजच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. ट्रेलरमध्ये हर्नांडेजला एका अशा शेतकऱ्याच्या रुपात दाखविण्यात आले आहे, जो अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण करू इच्छितो. ‘अ मिलियन माइल्स अवे’ ट्रेलरमध्ये हर्नांडेज अंतराळात जाण्याचे स्वप्न अथक परिश्रमानंतर पूर्ण करताना दिसून येतो. चित्रपट मेक्सिकोतील एका गावापासून जोसचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतचा प्रवास दाखविणार आहे. वारंवार नकार मिळाल्यावरही हार न मानणारा आणि दरवर्षी अधिक मेहनत करून अंतराळ कार्यक्रमासाठी जोस वारंवार अर्ज करत होता. अंतराळवीर होण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी जोस शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे यात दिसून येते. हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील दृश्यंही दिसून येतील. दिग्दर्शक एलेझांद्रा मार्केज अबेला यांनी या चित्रपटाद्वारे हर्नांडेज परिवाराची कहाणी मोठ्या पडद्यावर दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. मायकल पीना, रोजा सालाजार, बॉबी सोटो, सरयू ब्ल्यू, वेरोनिका फाल्कन, ज्युलियो सेसर सेडिलो, गॅरेट डिलाहंट आणि एरिक जॉन्सन हे कलाकार यात दिसून येणार आहेत.









