हुमा कुरैशी पुन्हा मुख्य भूमिकेत
ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित होणारी बहुचर्चित सीरिज ‘महारानी’च्या चौथ्या सीझनचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. निर्मात्यांनी याच्या चौथ्या सीझनची घोषणा काही काळापूर्वी केली होती. आता याचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी याची कहाणी बिहारच्या सीमा पार करत थेट दिल्लीच्या राजकारणात धडक मारणारी असणार आहे. सीरिजमध्ये हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत म्हणजेच रानी भारती ही व्यक्तिरेखा साकारत आहे. रानी भारती आता बिहारच नव्हे तर देशाचे राजकारण हादरवून टाकण्याच्या तयारीत आहे. ‘जर तुम्ही आमच्या शत्रूसोबत हातमिळवणी केली तर तुमचे सिंहासन काढून घेऊ’ या आशयाचा संवाद तिच्या तोंडी ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.
रानी भारती नेहमीच अडथळ्यांना दूर करण्याचे काम करत राहिली आहे. परंतु यावेळी तिची महत्त्वाकांत्रा नवी उंची गाठणार आहे. एका गृहिणीपासून बिहारच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा तिवास प्रवास यापूर्वीच सर्वांना चकित करणारा ठरला आहे. आता ती देशाच्या सर्वात कठिण राजकीय संघर्षात पाऊल ठेवत आहे. महारानी 4 सीझन केवळ नवा अध्याय नाही तर रानीचे सर्वात साहसी पाऊल असल्याचे हुमा कुरैशीने म्हटले आहे. या सीरिजचे दिग्दर्शन पुनीत प्रकाश यांनी केले आहे. हुमा कुरैशीसोबत या सीझनमध्ये विपिन शर्मा, अमित सियाल, विनीत कुमार, शार्दुल भारद्वाज, कानी कुसरुति आणि प्रमोद पाठक हे कलाकार दिसून येणार आहेत. ‘महारानी 4 सीझन’ 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









