रिलायन्स जिओ व भारती एअरटेल यांच्याशी होणार 5-जी वर चर्चा
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
शहरी भागात 5 जी नेटवर्कमध्ये असणाऱ्या त्रुटी संदर्भात उपाय काढण्यासाठी व अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येत्या आठवड्यात देशव्यापी रोलआउटवर चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) लवकरच रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसोबत बैठक घेणार आहे.
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टीएसपी) सेवा सुरू केलेल्या शहरांमध्ये 5जी कनेक्टिव्हिटीची सरासरी पातळी वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु सरकारला अनेक शहरी भागातील कनेक्टिव्हिटीमधील प्रचंड तफावतीवर चर्चा करायची असल्याची माहिती आहे. ट्रायच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक शहरी भागात 5जी कव्हरेजची समस्या कशी सोडवता येईल हे पाहण्यासाठी एक बैठक बोलावण्यात येणार आहे.
सेवा व गुणवत्ता यावरही होणार चर्चा
सुरुवातीच्या अहवालात कॉल ड्रॉप्स आणि सर्व सर्कलमधील 5जी वापरकर्त्यांकडून खराब ऑडिओ कनेक्टिव्हिटी या प्रमुख समस्या दाखवल्या आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, आगामी बैठकीत सध्या विकसित होत असलेल्या 5जी सेवा गुणवत्ता मानकांवरही चर्चा केली जाईल.









