भारतातील झारखंड राज्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. या राज्यात अनेक इतिहासप्रसिद्ध वास्तू, गड आणि मंदिरे आहेत. त्यांच्यापैकीच एका गडाची ही कहाणी आहे. या राज्यातील हजारीबाग जिल्ह्यात हजारीबाग शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर पद्म नामक गड आहे. रामगढचे सम्राट राजा राम नारायण सिंग आणि त्यांचे वंशज हे या गडाचे स्वामी आहेत. तसेच हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून तेथे सहस्रावधी पर्यटकांचे नेहमी आगमन होत असते.
रामगढ राजवंशाचे मूळ पुरुष राजा बाघदेव सिंग हे मानले जातात. त्यांनी आपल्या राज्याची स्थापना 14 व्या शतकात केली होती. पुढे इंग्रजांच्या राज्यात हे राज्य एक संस्थान बनले. 18 व्या शतकात या गडाचे स्वरुप पालटविण्यात आले. इसवी सन 1873 मध्ये जेव्हा या संस्थानची राजधानी पद्म येथे नेण्यात आली, तेव्हा या पद्मगडाची निर्मितीही करण्यात आली होती. हा गड निर्माण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागला होता, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
1873 पासून पुढे 1970 पर्यंत, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या गडाचे महत्व टिकून होते. तसेच, हा गड तोवेळपर्यंत गजबजलेला होता. या संस्थानच्या महाराजांजवळ इंपोर्टेड कार्सचा एक मोठा ताफा होता. या कार्स गडासमोरच्या मोकळ्या मैदानात ठेवलेल्या असत. त्या पाहण्यासाठीही अनेक प्रजाजन येत असत. या गडाच्या वसतीस्थानात 150 कक्ष, गडाच्या प्रवेशद्वारावर झुलणारा हत्ती, मोठ्या संख्येने घोडे, शस्त्रास्त्रे, मौल्यवान वस्त्राभूषणे इत्यादी सर्व सरंजामी थाटमाट येथे होता. ब्रिटनहून मागविलेल्या वीजनिर्मिती केंद्रामुळे सूर्य मावळला की गड वीजेच्या दिव्यांनी झगमगून जात असे. वीज हा त्यावेळी सर्वसामान्यांसाठी चमत्काराहून कमी बाब नव्हती. पण तीही येथे उपलब्ध होती. तथापि, नंतर हा गड आणि त्याचे वैभव यांना उतरती कळा लागली. राजघराण्याचे वंशज एकामागून एक लोप पावले. त्यामुळे गडाची डागडुजी करण्यासाठीही माणूस उरला नाही, अशी स्थिती झाली. गडाला कोणाची तरी दृष्ट लागली किंवा कोणीतरी दिलेल्या शापाचा हा परिणाम आहे, अशी चर्चा समाजात होऊ लागली. कारणे कोणतीही असेत, पण गडाची स्थिती दयनीय झाली आणि केवळ अवषेत तेव्हढे उरले. आज येथे केवळ उत्सुकतेपोटी पर्यटक येत असतात.









