ग्रामीण भागासह गोवा-कोकणहून खरेदीसाठी बेळगावात येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढणार
बेळगाव : देशात सर्वत्र अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. नवरात्र संपताच शहराला दिवाळीच्या उत्साही पर्वाची चाहूल लागली आहे. दिवाळीसाठी विविध साहित्याने बाजारपेठ नटली आहे. मात्र, सणाच्या निमित्ताने होणारी खरेदी या कारणास्तव ग्रामीण भागातून तसेच गोवा व कोकणहून खरेदीसाठी बेळगावात येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढणार आहे. वाढत्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि वाहतूक विभागाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक होणार आहे. बेळगाव शहराचे क्षेत्रफळ पूर्वी इतकेच असले तरी लोकसंख्येत दुप्पट भर पडली आहे. साहजिकच शहरात कोणत्याही रस्त्यावर व मुख्य म्हणजे वर्दळीच्या रस्त्यांवर नेहमीच गर्दी होऊन वाहतूक कोंडी होणे नित्याचेच झाले आहे. अलीकडे तर शनिवारी आणि रविवारी एखाद्या जत्रेप्रमाणे शहराच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी होत आहे. गर्दी वाढली की वाहतुकीचे व्यवस्थापन कोलमडते. धर्मवीर संभाजी चौक, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, किर्लोस्कर रोड, कपिलेश्वर ब्रिज कॉर्नर, आरपीडी चौक, अनगोळ मुख्य चौक, टिळकवाडी देशमुख रोड अशा महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणे नेहमीचेच झाले आहे. दिवाळी सणाच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठेत दाखल होत आहेत. परिणामी वाहनांची संख्या वाढते आहे.
वाहन पार्किंगची समस्या
बेळगाव शहरात वाहने पार्क करणे ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. रस्त्याकडेला वाहन पार्क करण्यासाठी जागा मिळविणे हे मोठे आव्हान आहे. अन्यत्र वाहन पार्क केले की वाहतूक पोलीस त्वरित टोईंग मशीनने गाडी उचलून नेतात. हेल्मेट नसेल, कागदपत्रे नसतील तर त्वरित दंडाचा बडगा उगारला जातो. परंतु पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची? याचे उत्तर वाहनधारकांना मिळत नाही. आस्थापनांमध्ये दुकाने थाटल्यामुळे तेथे पार्किंगची सुविधा होणे शक्य नाही. त्यामुळे वाहनांच्या गर्दीमध्ये अधिकच भर पडली आहे.
वाहतुकीची कोंडी
ऐन सणामध्ये वाहतुकीची कोंडी होणे हे गणेशोत्सव व नवरात्र या दरम्यान सर्वांच्याच अनुभवास आले आहे. पार्किंगची सोय नसल्यामुळे बेळगावमध्ये खरेदी न करणे बरे असे बाहेरगावचे खरेदीदार ग्राहक म्हणत आहेत. त्यांनी प्रत्यक्षात याचा अवलंब केल्यास बेळगाव बाजारपेठेवर त्याचा परिणाम होईल. याचाही विचार पोलीस व वाहतूक विभागाने करायला हवा. अचानक वाहतूक व्यवस्थेचा मार्ग बदलणे याचा विनाकारण फटका नागरिकांना बसतो. त्यामुळे ऐन सणामध्ये वाहतुकीचे नियोजन कसे होणार आहे, याची माहिती आधीच दिली तर ग्राहक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांची सोय होणार आहे.









