अस्तुली ब्रिजवर चिखल झाल्याने मार्ग बंद
वार्ताहर/रामनगर
बेळगाव-गोवा महामार्गावरील रामनगरनजीकच्या अस्तुली ब्रिजवर रस्ता चिखलमय झाल्याने अनेक अवजड वाहने अडकून पडली आहेत. गेल्या 15 दिवसांपासून लहान वाहनांसह बससेवा या मार्गावर बंद असल्याने कर्नाटकमधून गोव्यात जाणारी (अनमोड मार्गे) सर्व वाहने असू कॅसलरॉक मार्गे 12 कि. मी. चा फेरा मारून जात आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून पावसामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गावर चिखल झाला होता. त्यामुळे अवजड वाहनांना येथून वाहतूक करणे मुश्कील झाले आहे. या मार्गावर तीस तास वाहतूक बंद झाल्याने अस्तुली ब्रिजच्या दोन्ही बाजूंनी बुधवारपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत 5 ते 6 कि. मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अनमोड मार्गावर गेल्या 15 दिवसांपासून अवजड वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सदर वाहने कॅसलरॉकमार्गे फेरा मारून जात आहेत. मात्र, हा रस्ताही अरुंद असल्याने या मार्गावरही वाहतूक कोंडी होत होती. अस्तुली ब्रिजनजीक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. या रस्त्याचे काम घेतलेला ठेकेदार एखादी ट्रीप माती टाकून अवजड वाहनांना जाण्यास मार्ग अनुकुल करून देत होता. परंतु योग्य प्रकारे येथे मुरूम न टाकल्याने या ठिकाणी मोठे खड्डे पडून बुधवारी सकाळपासून मोठ्या वाहनांना हा रस्ता बंद झाला. त्यामुळे अस्तुली ब्रिजच्या दोन्ही बाजूंनी बुधवारी सकाळपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
काम घेतलेला ठेकेदार दिखावा करण्यासाठी काही प्रमाणात खडी घालून वेळ मारून नेत असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी अस्तुली ब्रिजनजीक पाहणी केली व ठेकेदाराला कायमस्वरुपी सुरळीत रस्ता करण्याच्या सूचना केल्या. स्थानिक वाहनधारकांना तिनईघाट-देवळी तसेच आजुबाजूच्या खेड्यांत येण्यासाठी 25 कि. मी. चा फेरा मारून यावे लागत असल्याने मोठा मनस्ताप होत आहे. त्यामुळे यापुढे तरी सदर रस्ता सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.









