खेड :
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यामुळे घाटातील जुन्या महामार्गावरील वाहतूक रोडावली आहे. यातच बोगद्यामुळे या मार्गावरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष झालेले असून रिफ्लेक्टरही गायब झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
बोगद्यातील कोंढवी वाहतुकीमुळे फाट्याजवळील पुलापलीकडील कातळी बंगला गावापर्यंत जाणारा रस्ता सुनासुना झाला आहे. या मार्गावर दुतर्फा लावलेले रिफ्लेक्टर गायब झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोंढवी फाट्यापासून काही अंतरावरील खचणाऱ्या १०० मीटर रस्त्याच्या धोकादायक भागावर यंदाही डागडुजी करण्यात आलेली नाही. येथे डांबरीकरण अथवा सपाटीकरण करण्याची तसदी घेण्यात आली नसल्याने मार्ग खडतर बनला आहे. या ठिकाणी रस्ता खचत असल्याने एक पोकलेन मशीन तैनात करण्यापलीकडे काहीही करण्यात आलेले नाही.








