कुसमळी पुलाचे अद्याप बरेच काम शिल्लक : दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्याचे काम अपुरे, वाहतूक धोकादायक
खानापूर : बेळगाव-गोवा-चोर्ला रस्त्यावरील कुसमळीजवळील मलप्रभा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचे काम पूर्ण होण्याअगोदरच घाईगडबडीत या पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मंगळवार दि. 1 जुलैपासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पुलाचे काम बरेच शिल्लक असून दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्याचे काम तसेच दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या भरावाचे काम शिल्लक आहे. अशातच पुलावरून वाहतूक सुरू केल्याने पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच वाहनधारकांनाही धोका पत्करून या पुलावरून वाहतूक करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाने योग्य विचार करून पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पुलावरील वाहतूक थांबविणे योग्य असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
बेळगाव-गोवा रस्त्यावरील चोर्ला मार्गावर कुसमळीनजीक मलप्रभा नदीवरील जुना पूल कमकुवत झाल्याने या ठिकाणी नवा पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. जानेवारी महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. पुलाची लांबी 90 मीटर असून रुंदी साडेपाच मीटर आहे. तसेच नदीचा पाण्याचा प्रवाहसुद्धा मोठ्या प्रमाणात असतो. जानेवारी महिन्यापासून या पुलाचे उभारणीचे काम हाती घेतले होते. मात्र पाऊस आणि इतर अडचणींमुळे पूल उभारणीच्या कामात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे जून 30 पर्यंत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. अद्याप दोन्ही बाजूना पुलासमान भराव टाकणे तसेच पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण कठड्याचे काम पूर्णपणे शिल्लक आहे.
तसेच इतरही कामे अपूर्ण असताना स्थानिक आणि परिसरातील वाहनधारकांकडून पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी होत होती. मात्र पुलाचे काम अर्धवट असून पूर्णपणे क्विरींग मजबूत झाले नसतानाच या पुलावरून चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहेत. या रस्त्यावरून गोव्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. दिवसभरात हजारो चारचाकी वाहने तसेच पीकअप वाहने आणि छोटी माल वाहतूक करणारी वाहने या पुलावरून जातात. त्यामुळे पुलावर हादरे बसत आहेत.
पुलाच्या मजबुतीत अडथळे निर्माण होणार आहेत.योग्य पद्धतीने पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच पुलावरून वाहतूक सुरू करणे गरजेचे होते. घाईगडबडीत प्रशासनाने वाहतुकीचा निर्णय घेतल्याने पुलाला धोका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कंत्राटदाराने या पुलावरून अवजड वाहतूक होऊ नये म्हणून उपाययोजना हाती घेतली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडून लोखंडी खांब रोवून फक्त चारचाकी वाहने जाण्यासाठी रस्ता करण्यात येत आहे. मात्र छोट्या चारचाकी वाहनातून माल वाहतूक होत असल्याने पुलाला धोका होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा संपूर्ण पुलाची पाहणी करून पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.









