वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष : पोलिस जातात मंत्र्यांच्या कार्यक्रमांना
पणजी : पणजीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून काल सोमवारी सकाळी व संध्याकाळी वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. एवढी गंभीर समस्या असून देखील एकही वाहतूक पोलिस वाहनचालकांच्या मदतीला रस्त्यावर नव्हता. दरम्यान गणेशचतुर्थीकडे पणजीतील वाहतूक समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. गणेशचतुर्थी केवळ सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेकजण चतुर्थी उत्सवानिमित्त सामान खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असून पणजीला येणारा रस्ता हा पाटोवरचा एक पूल आहे आणि सायंकाळी जाण्यासाठी बाजूलाच दुसरा पूल आहे. या पुलावरून वाहतुकीची सकाळी आणि संध्याकाळी जबरदस्त कोंडी होते आणि ही वाहतुकीची कोंडी अनेक कारणांमुळे होत असते.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी बेकादेशीरपणे वाहने पार्किंग करून ठेवली जातात. तथापि वाहतूक पोलिस कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे हे प्रश्न गंभीर होत आहेत. जुन्या पाटो पुलावर आणि त्यानंतर पुढील बसस्थानक रस्त्यापर्यंत जाताना दोन्ही बाजूला गाड्या पार्क करून ठेवल्या जातात. पाटो येथे एका हॉटेलमध्ये कॅसिनो चालतो आणि त्यात जाण्यासाठी अनेकजण गाड्या रस्त्यावर पार्किंग करून ठेवतात, कारण त्या हॉटेलकडे पार्किंग व्यवस्था नाही. परिणामी सायंकाळच्या दरम्यान नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. पोलिसांना हे माहीत असून देखील ते पूर्णत: डोळेझाक करतात. कदाचित त्यांना मंत्र्यांनी डोळेझाक करण्यास सांगितले असावे.
रुआ द औरे रस्त्यावर कोंडी
बसस्थानकापासून ते ऊआ द औरे पर्यंत सायंकाळी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. सकाळीच्या दरम्यान देखील अशाच पद्धतीच्या रांगा बसस्थानकपासून ते जुन्या सचिवालयापर्यंत नेहमीच दिसून येतात.
बांदोडकर मार्गावर कॅसिनोंच्या गाड्या
सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहने मोठ्या प्रमाणात येतात हे माहीत असून देखील भाऊसाहेब बांदोडकर रस्त्याच्या बाजूला कॅसिनोवाल्यांच्या गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यातून वाहतुकीची कोंडी ही पुढे बसस्थानकापर्यंत होत असते.
वाहनांची गर्दी वाढणार
पुढील आठवड्यात होणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त पणजीत सामान खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत राहतील. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होणार आहे.
पोलिस मंत्र्यांच्या कार्यक्रमांना
सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांना मंत्र्यांच्या कार्यक्रमाला पाठविले जाते. प्रत्यक्षात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या पोलिसांची आवश्यकता आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.मांडवी नदीकिनारी अष्टमीची फेरी सध्या चालू आहे. त्यामुळे भाऊसाहेब बांदोडकर मार्गवर तसेच अन्य मार्गावरही प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी सायंकाळच्या दरम्यान तसेच दुपारीदेखील दिसून येते. वाहतूक पोलिसांचे शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने वाहतुकीची कोंडी आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.









