पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची संवाद कार्यक्रमात माहिती
बेळगाव : पोलीस आयुक्तालयाच्यावतीने वाढती सायबर गुन्हेगारी, बालसुरक्षा, रस्तेसुरक्षा, अमलीपदार्थ सेवन व तस्करी विरोधी कारवाई, वाहतूक व्यवस्था, त्याचबरोबर राज्य सरकारच्या सूचनेनुसार ‘पोलीस आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बुधवारी बेळगाव पत्रकार संघाच्यावतीने माहिती व प्रसार खात्याच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या संवाद कार्यक्रमात दिली. आयोजित संवाद कार्यक्रमात पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, ‘पोलीस आपल्या दारी’ ही संकल्पना जुन्या बीट पोलीसनुसार सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस सायकलवरून आपल्या बीटवर जात होते. त्यानंतर मोटारसायकल आली. मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताचा ताण वाढत आहे. बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, आंदोलने यासाठी 70 टक्के पोलीसबळ वापरले जाते. तर 20 टक्के पोलीसबळ गुन्ह्यांचा तपास आणि 10 टक्के रहदारी नियोजनासाठी वापरले जाते. पोलीस कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन ते तीनवेळा रात्रपाळी करावी लागते.
सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुन्हेगार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हे यापुढे कमी होणार नसून ते वाढत जाणार आहेत. यंदा देशात 23 हजार करोड सायबर फसवणुकीचे गुन्हे घडले आहेत. सायबर फसवणूक झाल्यास संबंधितांनी 1923 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला पाहिजे. पैसे गमावल्यानंतर अनेकजण घाईगडबडीत भीतीपोटी पोलीस स्थानकात येतात. त्यांना सर्वप्रथम बसण्यास सांगून, पिण्यासाठी पाणी दिले जाते. त्यानंतर पोलीस विचारणा करतात. आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे आहे. हेल्पलाईन क्रमांकावर 24 तासांत संपर्क साधल्यास गमावलेले पैसे फ्रीज (गोठता) करता येऊ शकतात. त्यामुळे सायबर फसवणुकीच्या काळात गोल्डन आवर महत्त्वाचा आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी खबरदारी हा एकमेव उपाय आहे. बालसुरक्षा ही एक मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बापाकडून किंवा भावाकडून घृणास्पद कृत्य होत आहेत. अशावेळी संबंधिताचे आपल्या डोकीवरील नियंत्रण सुटलेले असते. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींबाबत अनेक घटना घडत असतात. पण समाजात आपली अब्रू जाईल, या भीतीने तक्रार देण्यास पुढे येणाऱ्यांची संख्या कमी आहे.
रस्ते सुरक्षितता ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे. मोटारसायकलवर बसताना आपली जबाबदारी ओळखून हेल्मेट परिधान केले पाहिजे, कार चालविताना सिटबेल्ट घालावा, हे अंगवळणी करून घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहेत. रात्रीच्यावेळी रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे अपघात होऊ नये यासाठी 460 बॅरिकेड्सवर रिफ्लेक्टर्स बसविण्यात आले आहेत. वाहतुकीचे कशा पद्धतीने नियमन करावे, यासंदर्भात स्थानिक पोलिसांना बेंगळूर वाहतूक पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. अमलीपदार्थाविरोधात कारवाई सुरूच आहे. मात्र आपली मुले अमलीपदार्थाच्या आहारी जाऊ नयेत, पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेऊन त्यांची लक्षणे जाणून घेतली पाहिजेत. पोलिसांना लवकरच नॉर्कोटिक्स किट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या ठिकाणी खुल्या जागांवर नशाबाजी केली जात आहे, त्या जागांची पाहणी करून छापेमारी केली जाणार आहे.
महिला-विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी चन्नम्मा पथक कार्यरत
पोलिसांवर पुढील महिन्यापासून सणांच्या बंदोबस्तांचा ताण वाढणार असल्याने शिफ्ट ड्युटी प्लॅन तयार करत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी बोलताना दिली. महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी चन्नम्मा पथक कार्यरत आहे. ते अधिक सक्षमपणे कार्यरत करू, गुन्हा कोठेही घडो नजीकच्या पोलीस स्थानकात झिरो एफआयआर दाखल करून घेण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. विविध पोलीस स्थानकात गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली वाहने पडून आहेत. त्यामुळे सर्व पोलीस स्थानकांतील वाहने एकाच ठिकाणी ठेवण्याचा विचार सुरू आहे. सध्या पोलीस वाहन चालकांची अडवणूक करत नसले तरी मोबाईल, बॉडी कॅमेरा व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना टीएमसीमधून नोटीस पाठविली जात आहे. यापूर्वी पोलीस स्थानकात जाऊन दंडाची रक्कम भरावी लागत होती. पण आता बेळगाव वन केंद्रातदेखील दंडाची रक्कम भरता येते. यावेळी संघाध्यक्ष विलास जोशी यांनी स्वागत केले. रवी उप्पार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
‘माझा सल्ला माझ्या बेळगाव’साठी यावर आपले मत मांडा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते, महानगरपालिका आणि कन्टोन्मेंटला रस्ते, दुभाजक व इतर समस्यांबाबत यापूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. बेळगाव शहरातून दररोज 4 हजारांहून अधिक ट्रक ये-जा करतात. 2600 परिवहन खात्याच्या बसेसची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात रहदारी समस्या मार्गी लावण्यासाठी अधिक प्राधान्य दिले जाईल. तसेच रस्त्याच्या कडेला थांबविण्याऐवजी त्यांच्यासाठी ‘बस बे’ची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महापालिकेशी संपर्क साधून शहरात ‘पे पार्किंग’ची जागा निश्चित केली जाणार आहे. नागरिकांना काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असल्यास पोलीस खात्याच्या वेबसाईटवर भेट देऊन ‘माझा सल्ला माझ्या बेळगाव’साठी यावर आपले मत मांडावे, असे आवाहनदेखील पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले.









